नागपूर: महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात शोधण्यात येत आहेत. असेच एक सर्वेक्षण ट्विटरवर करण्यात आले असून स्पर्धा परीक्षार्थींचा कौल जाणून घेण्यात आला.
दोन-तीन टक्क्यांच्या मतांचा फरक
लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक वातावरणाला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणून लोकसभेला मविआ आणि महायुतीतील दोन-तीन टक्क्यांच्या मतांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर विरोधक ही योजना राज्याला कशी खड्ड्यात घालणार ते आपले सरकार आले की ते दीड देतायत आम्ही दोन हजार देऊ अशा दोन टोकाचा प्रचार करत सुटले आहे.
दीड लाख लोकांचा कौल यांना
लोकपोल या संस्थेनेही एक सर्वेक्षण केले असून २८८ मतदारसंघाताली सुमारे दीड लाख लोकांचे मत यासाठी विचारात घेण्यात आले आहे. राज्यात नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागणार आहे. महायुती आणि मविआ अशी थेट लढत अपेक्षित आहे. तरीही प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे छत्रपती, मराठा आंदोलक अशी तिसरी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधकांनुसार अजित पवारही त्या जहाजात असू शकतात. तरीही मविआ आणि महायुती असा थेट लढा पाहिला तर २८८ पैकी भाजपाप्रणित महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला १४१ ते १५४ जागा मिळताना दिसत आहेत.
हे ही वाचा…आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…
महायुतीसाठी धक्कादायक बाब…
लोकपोलच्या सर्वेक्षणात महायुतीसाठी पर्यायाने भाजपाला धक्कादायक बाब म्हणजे ३८ ते ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला ४१-४४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. यामुळे लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मविआला ३-४ टक्क्यांचा आधार मिळणार आहे. ही मते शिंदे-फडणवीसांची सत्ता घालविणारी ठरणार आहेत. स्पर्धा परीक्षार्थींनी आपला कौल हा महाविकास आघाडीला दिलेला आहे. ७१ टक्के विद्यार्थी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला मतदान करू इच्छितात, तर १८ टक्के विद्यार्थी महायुतीच्या बाजूने आहेत, अकरा टक्के विद्यार्थ्यांनी त्यांचा निवडणुकीवर विश्वास नसून मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा मतदारांचा तात्पुरता कौल असून येणाऱ्या काळात ते चित्र स्पष्ट होणार आहे.