पोलीस आयुक्तालयात यापूर्वीच सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, लॉगीन आयडी नसल्यामुळे ठाण्यात तक्रार नोंदवण्यास अडचणी येत होत्या. परंतु, आता पोलिसांना सीसीटीएनएसचे ‘गो लाईव्ह’ आणि ‘लॉगीन आयडी’ प्राप्त झाला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगाराने फसवणूक केल्यास कोणत्याही पोलीस ठाण्यात, सायबर पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन तक्रार करता येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते सायबर पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीच्या स्थानांतरण सोहळ्यात बोलत होते.सदरमधील पटेल बंगला या इमारतीत स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे कामकाज आज मंगळवारपासून सुरू झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर : ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्याने ६ व्या माळ्यावरून उडी घे‌त संपविले जीवन

पूर्वी हे ठाणे सिव्हिल लाईनमधील गुन्हे शाखेच्या प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या माळ्यावर होते. आजच सुरू झालेल्या ठाण्यात एका महिलेची पहिली तक्रार नोंदवण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, सायबर गुन्ह्यांची संख्या बघता स्वतंत्र सायबर ठाण्याची गरज होती. या ठाण्यात गो लाईव्ह आणि लॉगीन आयडी नसल्यामुळे थेट तक्रार (एफआयआर) दाखल करताना अडचणी येत होत्या. आता ती समस्या सुटली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर पथक नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये एक उपनिरीक्षक आणि पाच कर्मचारी असतील. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने घेण्यात येणार आहे.

सायबर पोलीस ठाण्यात सध्या एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि २७ कर्मचारी आहेत. या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, नीवा जैन, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित आणि झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने उपस्थित होते.

हेही वाचा >>>नागपूर : चिंताजनक! शहरात ९०० हून अधिक इमारती जीर्ण

विशेष कक्षातून समाज माध्यमांवर लक्ष
सायबर ठाण्यात समाज माध्यम लॅबची निर्मिती करण्यात आली असून पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या समाज माध्यमांवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे गुन्हे प्रतिबंध, गुन्ह्याचा तपास, गुन्ह्यांचा छडा आणि आरोपींना शिक्षा होईल, असे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. आयटी ॲक्ट लागत असल्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यामुळे एकाच निरीक्षकावर ताण येऊ नये म्हणून गुन्हे शाखा, आर्थिक शाखा आणि वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>नागपूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व ; काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती

दोन हजार तक्रारींचेे लवकरच समाधान
ऑनलाईन पोर्टलवर आलेल्या सायबर स्वरूपाच्या दोन हजार तक्रारींचे लवकरच समाधान शोधले जाणार आहे. आज उद्घाटन झाल्यानंतर एका महिलेने सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. कोतवालीत राहणाऱ्या या महिलेशी इंस्टाग्रामवरून एका युवकाने मैत्री केली. त्याने वेगवेगळे आमिष दाखवून ९ लाख ३५ हजार रुपये उकळले. पैसे परत मागितले असता तो धमकी देत आहे, अशा स्वरुपाची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complain about cyber crimes online amy