लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयाविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार प्रिया फुके यांनाच पोलीस त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरुवारी नितीन फुके यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी प्रिया फुके यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

फिर्यादी प्रिया फुके यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी. आ. परिणय फुके यांच्यासह त्यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (७२), आई रमा फुके (६७), पत्नी डॉ. परिणीता फुके (४१) आणि नितीन फुके (४०) यांच्यावर गुन्हा दखल केला आहे. पती संकेत फुके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून धमक्या देण्यात येत होत्या. फुके कुटुंबीयांनी एटीएम, बँकेचे पासबुक, पासवर्ड रेकॉर्ड, दागिने जबरदस्तीने काढून घेतले. संकेतचे ‘अताशा आशीर्वाद बिल्डर्स’मध्ये ४० टक्के शेअर्स होते. ते परस्पर सासू-सासऱ्यांच्या नावाने करून घेतले. याबाबत नितीन फुके यांना विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली, असे प्रिया फुके यांनी अंबाझरी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

आणखी वाचा-कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, कामठीतून सुरेश भोयर, सावनेर मध्ये केदार यांच्या पत्नी रिंगणात

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. पण, आरोपींवर कारवाई केली नाही. दुसरीकडे नितीन फुके यांनी केलेल्या तक्रारीवरून आता प्रियलाच पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात नितीन फुके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या नातेवाईकांनी दूरध्वनी घेतला व या प्रकरणात काहीच बोलायचे नसल्याचे सांगितले. नितीन फुके सध्या उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांनी फोन ठेवला.

नितीन फुकेंच्या तक्रारीत काय?

प्रिया फुके यांनी मनीष अशोक राऊत यांच्या मदतीने घर खाली करण्याची तसेच घरात तोडफोड करण्याची धमकी दिल्याचे तक्रार अर्जात नितीन फुके यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कोणताही वेळ न गमावता प्रिया फुके यांना लगेच नोटीस पाठवली आहे.

“माझ्या तक्रारीवरून नितीन फुके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ते संतापले. अंबाझरी, हिलटॉप येथील परिणय अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०२ हा माझ्या नावे असून तो खाली करून मागितल्यामुळे ही खोटी तक्रार करण्यात आली. आमदार परिणय फुके आणि कुटुंबीयांविरुद्ध दाखल गुन्ह्यात कारवाई करण्याऐवजी पोलीस मलाच त्रास देत आहेत.” -प्रिया फुके

“प्रिया फुके यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली. त्यावरून प्रिया यांना नोटीस देण्यात आली. नितीन फुके आणि प्रिया फुके यांना सोमवारी पोलीस ठाण्यात बोलावले आहे.” -मनीषा वरपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबाझरी पोलीस ठाणे.