लोकसत्ता टीम
नागपूर: एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात डिझेलच्या तुटवड्याचा प्रश्न पुढे आला असतानाच आता एका महिला कर्मचाऱ्याने थेट विभाग नियंत्रकाने त्रास दिल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महामंडळाकडून चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
आणखी वाचा- ‘मध्य प्रदेश’कडून आंतरराज्यीय तपासणी पथनाके बंद, महाराष्ट्रकडून टाळाटाळ कशाला?
सूत्रांच्या माहितीनुसार, एक महिला कर्मचारी विभाग नियंत्रकाकडे फाईल घेऊन गेली. त्यावर तुला फाईल कुठे द्यावी, हे कळत नाही काय यासह इतर अर्वाच्च भाषेत शेरेबाजी विभाग नियंत्रकाने केली. तीन कर्मचाऱ्यांपुढे अपमान बघून महिला स्तब्धच झाली. ही माहिती कळल्यावर काहींनी तिला धीर दिला. शेवटी तिने ही तक्रार संबंधित एसटी महामंडळातील अधिकाऱ्याला दिली. प्रकरणाचे गांभीर्य बघत हा प्रकार एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत गेला. त्यावर एसटी महामंडळाकडून झटपट एक समिती गठित करत महिलेसह एकूण तीन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. या विषयावर एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर तक्रारदार महिलेनेही तूर्तास बोलण्यास नकार दिला. तर एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी एका महिलेच्या तक्रारीवरून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.