नागपूर : रेल्वेस्थानक पुनर्विकासाची कामे इंडियन स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी) ऐवजी संबंधित झोनला देण्याच्या निर्णयामुळे नागपूर स्थानकाच्या पुनर्विकास कामांना विलंब झाला. आता ब्रिटिशकालीन जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या आणि पावसाळी नाल्यांच्या गुंतागुंतीमुळे हा प्रकल्प ३६ महिन्यांत पूर्ण होणे अशक्य असून त्यास किमान सहा महिन्यांचा अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे बोर्डाने इंडियन स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी) गुंडाळून ते रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथिरिटीमध्ये (आरएलडीए) विलीन केले आहे. देशभरातील स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे संबंधित झोनकडे सोपवण्यात आली आहे. परिणामी, अनेक वर्षांपासून जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक विकसित करण्याचे काम विलंबाने सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर कामाला धडक्याने सुरुवात झाली. मात्र, नागपूर महापालिकेच्या जुन्या मलवाहिन्या, जलवाहिन्या आणि पावसाळी नाल्या यांची गुंतागुंत वेगळी करून बांधकाम करावे लागत आहे. त्यामुळे कामाची गती संथ झाली आहे, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूर रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ४८७.७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास ३६ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पात पश्चिमेकडील हेरिटेज स्टेशन इमारतीचे मूळ वैभवात पुनर्संचयित करणे समाविष्ट आहे. पुनर्विकसित स्थानकावर सर्व प्रवासी सुविधांसह प्रशस्त छताचा प्लाझा असणार आहे. पुनर्विकसित स्टेशन इमारतीमध्ये लिफ्ट आणि ‘एस्केलेटर’ची तरतूद आहे. त्यात बहुस्तरीय पार्किंग सुविधा असेल. दिव्यांग अनुकूल डिझाईन, ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात येणार आहेत. या इमारतीमध्ये सौरऊर्जा, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण व्यवस्था करण्यात येणार आहे. याविषयी मध्य रेल्वे नागपूर विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे म्हणाले, नागपूर स्थानक पुनर्विकासाचे काम सुरू आहे. पण, वेळेवर उद्भवणाऱ्या समस्या, अडचणींमुळे हा प्रकल्प ३६ महिन्यांत पूर्ण होईल असे वाटत नाही. थोडाफार विलंब होऊ शकेल.
हेही वाचा – अमरावती : खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे बळकावली नोकरी
ही कामे सुुरू आहेत
या प्रकल्पासंदर्भात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बाजूला केबल शिफ्टिंगचे काम, माती परीक्षण, साइट लॅब चालू करणे, बॅचिंग प्लांटची स्थापना, पूर्वेकडील युटिलिटी शिफ्टिंग, पार्किंग क्षेत्राचे स्थलांतर आणि व्हील वॉश युनिटची स्थापन करण्याचे काम झाले आहे. तर पूर्व बाजूला पायव्याचे काम, पूर्व बाजूचे उत्खनन काम, पश्चिम बाजूचे उत्खनन काम आणि पश्चिमेकडील जुन्या महापालिकेच्या पाईपलाइनचे काम सुरू आहे.