लोकसत्ता टीम
नागपूर: हृदयातील मुख्य रक्तवाहिका फाटली वा त्यामुळे त्यातील व्हॉल्वमध्ये गळती लागली तर पूर्वी असे रुग्ण मुंबई, दिल्लीसह इतर मोठया शहरातील रुग्णालयात जायचे. आता नागपुरातील रुग्णालयांत या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत आहेत. अर्नेजा रुग्णालयातच अशा पाच बेंटल शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
उपराजधानी वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणातूनही गंभीर रुग्ण येथील विविध रुग्णालयात उपचाराला येतात. अर्नेजा रुग्णालयाचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, ‘बेंटल’ शस्त्रक्रियेत ‘एरोटिक व्हॉल्व्ह’ सोबतच महाधमनी (एरोटा) बदलावे लागतात. ही क्लिष्ट आणि मोठी अशी शस्त्रक्रिया आहे.
आणखी वाचा-‘चंद्रताल’मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी नागपूरच्या डॉक्टरची धडपड!
बरेच ज्ज्ञ ही शस्त्रक्रिया करणे टाळतात. आम्ही गेल्या सहा महिन्यात पाच रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली. डॉ. अविनाश शर्मा म्हणाले की, शस्त्रक्रियेदरम्यान ह्रदयाचा व्हॉल्व्ह आणि पाईप एकत्र करावा लागतो. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. डॉ. अमर आमले म्हणाले की, ज्या रुग्णांवर बेंटल शस्त्रक्रिया झाली त्या रुग्णांची प्रकृती आता सामान्य आहे. डॉ. विवेक मांडुर्के म्हणाले, अनियंत्रित उच्च रक्तदाब, वाढते वय आणि इतर वैद्यकीय कारणांनी मुख्य धमणीमध्ये समस्या निर्माण होत आहेत. डॉ. अभय ठाकरे म्हणाले, ही शस्त्रक्रिया केवळ ‘इकोकार्डियोलॉजिकल स्किल’च्या आधारेच चांगली होऊ शकते.