नागपूर : तीन वर्षीय चिमुकल्याच्या स्पायनल काॅडमध्ये अतिरिक्त हाडनिर्मिती होऊन ‘मल्टिलेव्हल डायस्टोमॅटोमिया व टिथर कॉर्ड’ विकाराचे निदान झाले. या मुलाचे पाय लुळे पडायचे. मलमूत्र विसर्जन अनियंत्रित झाले होते. न्यूराॅन्स रुग्णालयाचे मेंदू शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. जनरल ऑफ क्लिनिकल इमेजिंग सायन्सनुसार हे जगातील दुसरे उदाहरण आहे, हे विशेष.
मुलाच्या पाठीच्या खालील भागात गाठ होती. पाठीचा कणा तिरपा होता, त्यामुळे पायात अशक्तपणा व उभे राहणे अशक्य होते. मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण नव्हते. डॉ. प्रमोद गिरी यांनी ‘डायस्टोमॅटोमिया व टिथर कॉर्ड’ अशा अत्यंत दुर्लभ आजाराचे निदान केले. जर्नल ऑफ क्लिनिकल इमेजिंग सायन्समध्ये या पद्धतीचे एक प्रकरण आढळले. त्यानंतर कुटुंबाच्या परवानगीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून अतिरिक्त हाड काढण्याचे निश्चित झाले. सध्या बाळाची प्रकृती उत्तम आहे.
वेळेत उपचारांनी अपंगत्व टळेल
“जन्मतः केसपुच्छ, मोठा डाग किंवा काहीतरी असामान्य असल्यास मुलाचे अचानक चालणे बंद झाल्यास या आजाराचे निदान शक्य आहे. रुग्णावर वेळीच योग्य उपचार केल्यास अपंगत्व टळू शकते. ”
– प्रा. डॉ. प्रमोद गिरी, मेंदूरोग शल्यचिकित्सक.