नागपूर : उपराजधानीसह राज्याच्या बऱ्याच भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यातच सर्वच वयोगटात पोटात गडबड असलेले रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. हा आजार उघड्यावरचे खाद्यपदार्थ आणि दूषित पाण्यातून झालेला संसर्ग यामुळे होतो.दोन- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपूरसह राज्याच्या बऱ्याच भागात पुन्हा पावसला सुरवात झाली आहे. त्यात गॅस्ट्रो अथवा पोटात गडबड करणारा आजार कुणाला झाला तर त्या रुग्णाची अवस्था बिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळी पोटदुखीपासून वेळीच सावध राहण्याची गरज आहे.
नागपूरच्या होमोलिओपॅथी तज्ज्ञ डॉ. श्रुती बेझलवार म्हणाल्या, पोटाच्या विकारांमध्ये विशेष करून अपचन होणे, जुलाब, उलट्या, मळमळ होणे, पोटफुगी, तसेच खाण्याची इच्छा न होणे यासारखे प्रकार पावसाळ्यात होतात. त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नये किंवा कोणतेही रस्त्यावरचे ज्यूस पिऊ नये. कारण त्यात दूषित पाणी असल्यास त्यामधील सूक्ष्म जंतू पोटात जाऊन पचनक्रियेत बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो गरम पदार्थ खावेत, थंड पदार्थ टाळावेत. रस्त्यावर, उघड्यावर मिळणारे हिरवी चटणी लावलेले सँडविच, पाणीपुरी यासारखे खाणे टाळावे. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. अनेक वेळा आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये ई-कोलाय नावाचे जिवाणू पोटात आढळून आल्याचे दिसून येत असते. दूषित पाण्यामध्ये हा जिवाणू आढळून येत असतो. या जिवाणूने पोटात प्रवेश केल्यानंतर पोटाचे कार्य बिघडवून विविध पोटविकारांना आमंत्रण देत असतो. अशा विकाराच्या आजारांवरील उपचारासाठी काही काळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी लागतात.पावसाळ्यात कावीळ होण्याची शक्यता असते. त्यामध्ये हिपेटायटिस ए आणि ई ही कावीळ दूषित पाणी शरीरात गेल्यामुळे होते.
हेही वाचा >>>Kuno National Park: कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत २० पैकी नऊ चित्ते दगावले
हेही वाचा >>>फिरत्या बसमध्ये अभ्यासाचे घडे, नागपुरात स्त्यावरील मुलांसाठी अभिनव उपक्रम
पावसाळी आजार टाळण्यासाठी महत्वाचे…
वॉशरूममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. जेवण योग्य पद्धतीने शिजवून घ्यावे आणि चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे. घरचे ताजे अन्न खावे. संतुलित आहार घ्यावा. व्यायाम करावा, सोबत योग केला पाहिजे. त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.तणावाचा परिणामसुद्धा शरीरातील पचनसंस्थेवर होत असतो. पोटविकाराच्या व्याधी उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधी घेऊ नये, असेही डॉ. बेझलवार यांनी सांगितले.