नागपूर : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली शहरातील वृक्षगणना सुरू असल्याची माहिती महापालिकेने शुक्रवारी सादर केली. आतापर्यंत दहा पैकी पाच झोनमध्ये पूर्ण झालेल्या वृक्षगणनेत तब्बल २६ लाख वृक्षांची गणना झाली असल्याचा दावा महापालिकेने केला. २०२३ साली सुरू झालेली वृक्षगणना अद्याप पूर्ण न झाल्याने उच्च न्यायालयाने मौखिक नाराजी व्यक्त करत ४ एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. शहरातील सिमेंटीकरणामुळे वृक्षांचा जीव गुदमरतोय अशी तक्रार करणारी जनहित याचिका शरद पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर न्या.नितीन सांबरे आणि न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. शहरात दर पाच वर्षात वृक्षगणना होणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मात्र, शहरात २०११ पासून वृक्ष गणना झालेलीच नव्हती. मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेला स्पष्टीकरण मागितले होते.

महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने शुक्रवारी शपथपत्र दाखल करत वृक्षगणनेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. शहरात वृक्षगणनेसाठी टेराकॉन इकोटेक कंपनीला ६ फेब्रुवारी २०२३ रोजी कंत्राट दिले गेले होते. दोन वर्षाच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप शहरातील दहापैकी केवळ पाच झोनमध्ये वृक्षगणना पूर्ण झाली आहे. यात हनुमाननगर झोन, नेहरूनगर झोन, गांधीबाग, लकडगंज, आसीनगर झोन यांचा समावेश आहे. सतरंजीपुरा झोनमध्ये ५० ते ६० टक्के गणना पूर्ण झाली आहे. धरमपेठ आणि धंतोली झोनमध्ये २० ते २५ टक्के गणना झाली आहे. लक्ष्मीनगरमध्ये ५ ते १० टक्के तर मंगळवारी झोनमध्ये १ ते २ टक्के गणना झाली आहे. या गणनेत आतापर्यंत एकूण २६ लाख ६ हजार ८८७ वृक्षांची गणना झाली असून संपूर्ण शहरात अंदाजे ४० लाख वृक्ष असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार आहे.

वृक्ष गुदमरत असल्याची कबुली

शहरात २०२० नंतर वेगाने सिमेंटीकरणाचे कार्य होत आहे. यामुळे शहरात वृक्षांचा जीव गुदमरत असल्याची कबुली महापालिकेने दिली. याबाबत महापालिकने रस्तानिहाय सर्वेक्षण केले असून ही माहिती आयुक्तांनी महापालिकेचे दहाही झोन, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएमआरडीए, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्राच्या माध्यमातून पाठविण्यात आले. या सर्व विभागांना त्यांच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांवर वृक्षांच्या सभोवताल मोकळी जागा सोडण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

झोननिहाय वृक्षसंख्या

झोन – वृक्ष

लक्ष्मीनगर – ६९ हजार ९९

धरमपेठ – दोन लाख ९३ हजार ८७७

हनुमाननगर – तीन लाख ९३ हजार ३४४

धंतोली – दोन लाख ७० हजार ९

नेहरूनगर – सात लाख ४० हजार ९५६

गांधीबाग – ५९ हजार ५२८

सतरंजीपुरा – १३ हजार ९१६

लकडगंज – दोन लाख ५३ हजार ३१३

आसीनगर – चार लाख ९१ हजार ३१०

मंगळवारी – २१ हजार ५३५