अमरावती: गोपालनगर परिसरातील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ घातला. काही क्षणातच याठिकाणी विभागीय आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले. रात्री ९ वाजतापासून सुरू झालेला हा गोंधळ मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढत कारवाईची मागणी केली.
बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपाल नगर परिसरातील राजीव गांधी शाळेतील मतदान केंद्रावर काल सकाळी सात वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या पेट्या वाहनातून स्ट्रॉंगरूम पर्यंत पोहोचविण्यात येत होत्या. मतदान केंद्रावर पाच खोल्यांमध्ये दहा मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदान केंद्रापासून काही अंतरावर उभे असलेल्या वाहनात दुचाकीवरून ईव्हीएम मशीन पोहोचवण्यात येत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. यावेळी वाद झाल्याने कर्मचारी ईव्हीएम सह मतदान केंद्रात पोहोचले. ईव्हीएमच्या पेट्या पळविल्या जात असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.
हेही वाचा >>>“भाजप वाझे, पाटील यांसारख्या गुन्हेगारांना पुढे करीत आहे काय ?”, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका
हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत नागरिकांनी मतदान केंद्राध्यक्षाविरुद्ध कारवाईची मागणी केली. पोलीस बंदोबस्ताअभावी हा प्रकार घडला, असा आरोप काहींनी केला तर काहींनी ईव्हीएम दुचाकीवरून नेण्यावरच आक्षेप घेत प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढले. या घटनेनंतर अपक्ष उमेदवार तुषार भारतीय, प्रीती बंड, आपल्या समर्थकांसह दाखल झाल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी मतदान केंद्राला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. मतदान केंद्र अधिकारी यांच्या उपस्थितीत शिल्लक ईव्हीएमची तपासणी करण्यात आली.
हेही वाचा >>>चंद्रपूर : पैसे वाटप करणाऱ्यांना ग्रामस्थांनी पकडले, निवडणूक पथकाच्या…
भारतरत्न राजीव गांधी शाळा ही अरूंद रस्त्यावर आहे. तेथपर्यंत मोठी वाहने पोहोचणे कठीण असते. परिणामी मोठी वाहने मुख्य रस्त्याच्या कडेला उभे करण्याशिवाय पर्याय नसतो. संबंधित कर्मचारी ईव्हीएम मुख्य रस्त्यापर्यंत दुचाकीवरून घेऊन जात असावेत, असे यावेळी सांगण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर माहिती घेतली. सर्व ईव्हीएम सुरक्षित असून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आहेत. ईव्हीएम बाबत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कुणीही शंका बाळगू नये, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.