लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्या युवकाची आत्महत्या की कुणीतरी त्याचा जाळून खून केला, याबाबत अद्याप संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी मात्र, जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून मृत्यूचे गुढ उकलण्यासाठी दोन पथके सज्ज केली आहे. ही घटना शनिवारी खापरखेड्यातील बर्फाच्या कारखान्यासमोर उघडकीस आली. या घटनेमुळे गावात वेगवेगळ्या चर्चा असून युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. ललीत वस्त्राने (३२) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत वस्त्राने हा पॉवर प्लॉंटमध्ये पोकलँड वाहनाचा चालक म्हणून कार्यरत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याने कंपनीत कुणाशीतरी वाद घातला होता. त्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून तो तणावात होता. त्यातून तो घरी पत्नीसोबत भांडण करीत तिला लहानसहान कामासाठी मारहाण करीत होता.

शुक्रवारी ललीतने पत्नीला खापरखेडा पोलीस ठाण्यात कंपनीतील कुण्यातरी अधिकारी किंवा ठेकेदाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी सोबत जाण्यासाठी तयार केले होते. मात्र, पत्नीने वेळेवर पोलीस ठाण्यात जाण्यास नकार दिला. त्यामुळे तो चिडला. त्याने पत्नीला मारहाण केली. तासाभरानंतर तो दारु पिऊन घरी आला. त्याने दुचाकीची तोडफोड केली. त्याला पत्नीला विरोध केला असता पुन्हा पत्नीशी भांडण करुन घराबाहेर पडला. शनिवारी सकाळी दहा वाजता तो घरातील दुचाकी आणि एक पिशवी घेऊन बाहेर पडला. तो थेट दुचाकी घेऊन खापरखेड्यातील बर्फाच्या कारखान्याच्या दिशेने निघून गेला.

दुचाकीची पेट्रोल टँकला लावली आग

ललीतने दुचाकी बर्फ कारखान्यासमोर उभी केली. दुचाकीची टँक उघडली आणि माचिसची काडी लावून दुचाकीला आग लावली. काही वेळातच गाडीचा मोठा भडका उडाला. काही मिनिटातच दुचाकी आणि ललीतचा कोळसा झाला. ही घटना तेथील एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्याने लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी ललीत हा जळत असताना त्या सुरक्षारक्षकाला दिसला.

घटना सीसीटीव्हीत कैद

खापरखेड्यातील एपी भारत कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे जळीतकांड कैद झाले. त्यामुळे खापरखेडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. फुटेजममध्ये ललीत एकटात दुचाकी घेऊन घटनास्थळाकडे जाताना दिसत आहे. ‘ललीत वस्त्राने याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्राथमिक अहवालावरुन आकस्मिक मृत्यूूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.’ अशी प्रतिक्रिया खापरखेड्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी दिली.