राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे बदल्या रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी बदल्याची वाट बघत असतानाच एक बनावट यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. बनावट यादीमुळे अनेकांचा हिरमोड झाला तर काहींनी प्रसारमाध्यमांवरूनच बदली झालेल्या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
हेही वाचा- बुलढाणा : मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर दरोडा, अडीच लाखांची लूट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातच आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, तरीही बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेदांमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याची चर्चा होती. गेल्या तीन दिवसांपूर्वीच गृहमंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. सोमवारी बदल्याच्या यादीला अंतिम रुप देण्यात येणार होते. परंतु, दुपारी दोन वाजताच्या सुमारास अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हॉट्सअँप ग्रूपवर प्रसारित झाली. मात्र, तासभरात गृहमंत्रालयात यादीबाबत चौकशी करून सत्यस्थिती जाणून घेण्यात आली. त्यानंतर यादी बनावट असल्याचे लक्षात आले. मात्र, या यादीमुळे राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. या बनावट यादीमध्ये नागपूरचे अमितेश कुमार (पुणे), संजीस सिंघल (मुंबई), मिलींद भारंबे (नागपूर), ब्रीजेश सिंह, विनयकुमार चौबे, अश्वती दोर्जे, छेरिंग दोर्जे, प्रवीण पडवळ, सुनील फुलार, संजय दराडे, चंद्रकिशोर मिना, आरती सिंह आणि आशूतोष डुंबरे यासह अन्य अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश होता.
हेही वाचा- वैदर्भीय बेरोजगारांची फरफट; ४१३२ बेरोजगारांची नोंदणी, मात्र, नोकरी ३४७ जणांना
बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता
यादीत बदली पात्र अधिकाऱ्यांची नावे असल्यामुळे या बदल्याच्या बनावट यादीवर अनेकांनी विश्वास ठेवला. मात्र, सत्यता समोर येताच हिरमोड झाला. गृहमंत्रालयाकडून बदल्यासाठी हालचाली सुरु असतानाच बनावट यादी समोर आली. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.