नागपूर : महानिर्मितीच्या कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता पदभरती प्रक्रियेत अद्याप आवश्यक उमेदवारांची निवड झाली नसतानाच प्रतीक्षा यादीत कमी नावे आहे.त्यामुळे उमेदवारांमध्ये संताप असून बरीच पदे रिक्त राहण्याचा धोका आहे. यादीत काही उमेदवारांची नावे चुकीच्या वर्गात दर्शवल्याची माहिती आहे.
महानिर्मितीमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये कनिष्ठ अभियंत्यांची ३२२ आणि सहाय्यक अभियंत्यांची ३३९ अशा एकूण ६६१ पदांसाठी जाहिरात निघाली. २६, २७ आणि २८ एप्रिल २०२३ ला परीक्षा झाली. निकाल १८ ऑगस्ट २०२३ रोजी लागला. त्यानंतर ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी होऊन जानेवारी २०२४ पासून २४३ कनिष्ठ अभियंता आणि २५१ सहाय्यक अभियंत्यांना नियुक्तीपत्र दिले गेले.
हेही वाचा >>>माकडचाळे… महिलेची पर्स बंधाऱ्यात फेकली, २१ हजारासह सोन्याची पोतही वाहून गेली
महानिर्मितीने निवड यादीसोबतच प्रतीक्षा यादीही लावली होती. परंतु, प्रतीक्षा यादीत कमी उमेदवारांची नावे होती. दरम्यान निवड यादीतील काही उमेदवार विविध कारणांनी रूजू झाले नाहीत. त्यामुळे महानिर्मितीने गेल्या आठवड्यात केवळ ४२ जणांची प्रतीक्षा यादी लावली. जास्त जागा शिल्लक असतांनाही या प्रतीक्षा यादीत नावे कमी टाकल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. त्यातही एका उमेदवाराने एनटी-सी खुल्या संवर्गात अर्ज केला असताना त्याची निवड माजी सैनिक गटातून झाल्याचे दर्शवले गेले. या उमेदवाराने महानिर्मिती अधिकाऱ्याच्या निदर्शास ही बाब आणल्यावर त्याची नियुक्ती वगळली. परंतु त्याला प्रतीक्षा यादीत घेतले नाही. दुसरीकडे क्रमवारीत एका मुलीच्या खालच्या क्रमांकावरील व्यक्तीची प्रतीक्षा यादीतून निवड झाली. तिने ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यावर महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने चूक कबूल करून पुढच्या यादीत नाव राहणार असल्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले.
उमेदवारांचे म्हणणे काय?
महानिर्मितीच्या पदभरतीची वैधता ऑगस्टमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतरही अधिकारी नवीन प्रतीक्षा यादी लागणार नसल्याचे सांगतात. उमेदवारांनी महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही मंत्र्यांची भेट घेतली. पण, काहीच झाले नाही. प्रतीक्षा यादीत केवळ दोनच नावे ठेवल्याने इतर जागा महानिर्मितीला रिक्त ठेवायच्या आहेत का, हा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.
हेही वाचा >>>खून, जाळपोळ अन् चकमकींसह स्फोटातही सहभाग; दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक
“ सर्व प्रक्रिया नियमानुसार आहे. आम्ही निवड यादी लावून उमेदवारांना नियुक्तीपत्रही दिले. रुजू न झालेल्या जागेसाठी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली असून तेथेही नियुक्ती होत आहे. यादीत वरच्या क्रमांवरील मुलीला डावलून खालच्या क्रमांकावरील उमेदवाराची नियुक्ती झालेली नाही. कुणा उमेदवाराला चुकीच्या संवर्गात दाखवलेले नाही. गरज पडल्यास ऑगस्ट २०२४ पूर्वी प्रतीक्षा यादीबाबत पुन्हा निर्णय होईल.”- डॉ. धनंजय सावळकर, कार्यकारी संचालक, मानव संसाधन, महानिर्मिती, मुंबई.
महानिर्मितीची पद भरती प्रक्रिया कशी?
महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीवर लागण्याकरिता ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ज्यामध्ये वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते सोबतच महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेसंदर्भात संबंधित उमेदवारांना वेळोवेळी कळविण्यात येते. मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर निवडीबाबतची अंतिम यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर देण्यात येते. एकूणच, महानिर्मितीमध्ये नोकरी करीता पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे महानिर्मितीचे म्हणणे आहे.
© The Indian Express (P) Ltd