नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा पूर्व परीक्षेची प्रत्येक पदनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याने एकच उमेदवार चारही पदांच्या यादीमध्ये पात्र ठरण्याची भीती असून यामुळे अन्य उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
‘एमपीएससी’ने संयुक्त गट-ब आणि गट-क संवर्गातील ८,१६९ विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यापैकी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मधील सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक या चार पदांसाठीच्या ११३५ जागांसाठी नुकतीच परीक्षा घेतली. मात्र, या पदांसाठी विभाग/प्राधिकारीनिहाय स्वतंत्रपणे निकाल लावण्यात येईल, असे आयोगाच्या जाहिरातीत नमूद आहे. विशेष म्हणजे, याआधी गट-ब मधील वरील चारही पदांचा अभ्यासक्रम वेगळा होता व त्यांची परीक्षाही वेगळी होत होती. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र निकाल जाहीर होणे अपेक्षितच होते. मात्र आता समान अभ्यासक्रम आणि एकच परीक्षा असतानाही स्वतंत्र निकाल जाहीर होणार असल्याने गुणांची सीमारेषा (कट ऑफ) वाढणार असून अनेकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी हे त्यांनी अर्ज केलेल्या सर्वच चारही पदांसाठी पात्र ठरतील. यामुळे त्यांच्या खालोखाल गुण असणाऱ्यांना पूर्व परीक्षेतूनच बाद केले जाणार असल्याने त्यांना मुख्य परीक्षेची संधीच मिळणार नाही. याउलट राज्यनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केल्यास अन्य उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये येऊन त्यांनाही मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने जाचक अटीमध्ये बदल करावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा – नागपूर : वंदे भारत एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू, १६ ऐवजी ८ डबे राहणार
लिपिक-टंकलेखकांच्या यादीमध्येही गोंधळ
‘एमपीएससी’ने गट-क च्या लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठीही ३० एप्रिलला परीक्षा घेतली. या पदाचीही विभाग/प्राधिकारीनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. जाहिरातीत एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग/प्राधिकरण आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरणांचा पर्याय म्हणून निवड करू शकतात. त्यामुळे उमेदवार अधिकाधिक विभागांसाठी अर्ज करतील हे निश्चित आहे. आयोगाकडून सर्व विभागातील लिपिक-टंकलेखक पदासाठी समान पूर्व परीक्षा घेतली. मात्र, त्यांची गुणवत्ता यादी विभागनिहाय जाहीर होणार असल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
राज्यसेवा आणि गट-ब मध्ये भेदभाव
‘एमपीएससी’कडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्येही अनेक पदांचा समावेश असतो. असे असतानाही समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असल्याने सर्व पदांसाठी एकच गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. मात्र, गट-ब व गट-क च्या अराजपत्रित पदांसदर्भात आयोगाने स्वतंत्र निकाल जाहीर करण्याचे नमूद केले. यामुळे सर्वाधिक गुण घेणारा उमेदवार सर्व पदांसाठी पात्र ठरणार असल्याने गुणांची सीमारेषा (कट ऑफ) वाढणार आहे. यामुळे मुख्य परीक्षेसाठीही कमी उमेदारांची निवड होणार असल्याने आयोगाने एकच गुणवत्ता यादी जाहीर करावी, अशी मागणी स्टुडंट राईट असो. ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांनी केली आहे.
हेही वाचा – नागपूर: प्रेमविवाह केल्याचा राग; सासऱ्यासह तिघांचा जावयावर प्राणघातक हल्ला
‘एमपीएससी’कडून प्रतिक्रिया देण्यास नकार
राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सचिव आणि सहसचिवांना यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संदेश पाठवला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.