अकोला : सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या तिकिटाचे भाडे देखील नियमित गाड्यांच्या तुलनेत जास्त राहणार असल्याचे प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. प्रवाशांना तिकिटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणासुदीचा काळ म्हटला की प्रत्येकाला आपल्या घराची ओढ लागते. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारे दिवाळी कुटुंबीयांसह साजरी करण्यासाठी आपले गाव गाठतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. दिवाळीचे आरक्षण साधारणत: तीन महिन्यांपूर्वीच फुल्ल होऊन जाते. रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून केले जाते. यंदा दिवाळी, छट सणांसाठी मध्य रेल्वे एकूण ३३४ विशेष गाड्या चालवणार आहेत. यातील सहा रेल्वेच्या एकूण १३२ फेऱ्या ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान अकोला मार्ग होत आहेत.

हेही वाचा >>> अमरावती : कंत्राटदाराचा लक्षवेधी कामचुकारपणा आणि प्रतिक्रियांचा पाऊस…

०११३९/४० नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक ही रेल्वे गाडी मागच्या वर्षीपासून विशेषच्या नावावर चालवली जात आहे. बल्हारशाह-एलटीटी विशेष गाडी देखील सुरू केली. सणासुदीच्या काळात चालवण्यात येणाऱ्या गाड्यांना देखील विशेषचा दर्जा आहे. या विशेष गाड्यांच्या तिकिटाचे भाडे देखील ‘विशेष’च राहते. नियमित धावणाऱ्या अमरावती एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, मुंबई-हावडा मेल, गितांजली एक्सप्रेस आदी गाड्यांचे अकोला ते कल्याणपर्यंतचे शयनयान डब्यातील प्रवास भाडे प्रत्येकी ३५० रुपये आहे.

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता उत्सव विशेष गाड्या धावणार; वाचा कुठे आणि केव्हा…

नागपूर-मडगाव विशेष गाडीचे अकोला ते कल्याण शयनयान क्षेणीचे ४१०, तर बल्हारशाह-एलटीटी विशेष गाडीचे भाडे याच दरम्यानचे तब्बल ४४० रुपये आहे. अंतर, वेग, वेळ, सुविधा त्याच असतांना केवळ गाड्यांच्या नावापुढे विशेष शब्द लावून प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे घेण्याचा प्रकार सुरू आहे. या माध्यमातून रेल्वेची कमाई होत असली तरी प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congestion in railway trains during festive season railways decided to run special trains ppd 88 ysh