अमरावती : केंद्रातील मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत प्रचंड दरवाढ केल्याच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज येथील राजकमल चौकात तीव्र निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करून प्रतिकात्मक निषेध नोंदवला.
हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis : “निवडणूक आयोग विकला गेला आहे, ते तर सरकारचे…”, खा. अरविंद सावंत यांची टीका
केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. प्रचंड महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. २०१४ मध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसच्या किमती वाढलेल्या असूनही सरकारने त्यावेळी तब्बल ८२७ रुपयांचे अनुदान देऊन सर्वसामान्यांना केवळ ४१० रुपयांमध्ये गॅसचे सिलेंडर उपलब्ध करून देण्याची तरतूद केली होती. परंतु सद्यस्थितीत मोदी सरकारने अनुदानाची रक्कम शून्यावर आणून सिलेंडरच्या किमती अकराशे रुपयांवर नेल्या आहेत.
हेही वाचा >>> माजी आमदार दिवाकर पांडे यांचे निधन
मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न नागरिकांना दाखवले होते. हेच ते चांगले दिवस आहेत का, असा सवाल करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वस्त सिलेंडर नामशेष झाल्याचे प्रतीक म्हणून सिलेंडरला हार घालून कथित ‘अच्छे दिना’ला श्रद्धांजली वाहण्यात आली. मोदी सरकारच्या ‘अच्छे दिना’ची प्रतीकात्मक तिरडी बांधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. या आंदोलनात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे, शहराध्यक्ष वैभव देशमुख आदी सहभागी झाले होते.