अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍या आरक्षणासंदर्भातील वक्‍तव्‍यावरून सध्‍या वाद सुरू असताना भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्‍हा एकदा वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. त्‍यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे’ असे खळबळजनक विधान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. या वक्तव्यावर आता काँग्रेस ने आक्रमक पवित्रा घेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कक्षात ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत डॉ. बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना अटक करणार नाही, तो पर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याची भूमिका आता काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी घेतली आहे. खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, शहराध्‍यक्ष बबलू शेखावत, प्रवीण मनोहर यांच्‍यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत.

हे ही वाचा…पंतप्रधानांचा दौरा अन् प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज दिवसभर जिल्ह्यात…

डॉ. अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी मनोरुग्‍णालयामध्ये भरती झाले पाहिजे. एखादा अडाणी माणून बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे. पण, हे तर डॉक्टर आहेत. डॉ. बोंडे हे बेअक्कल, मूर्ख आहेत‍. त्‍यांना शांतताप्रिय महाराष्‍ट्रात दंगल घडवायची आहे, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही. एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहेत, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

हे ही वाचा…राहुल गांधींच्‍या जिभेला चटकेच दिले पाहिजे….. आमदार  गायकवाडांनंतर आता  भाजपच्या ‘या’ नेत्याने थेट…..

तीन दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड यांना अजून अटक झालेली नाही म्हणूनच डॉ. अनिल बोंडे यांची हिंमत वाढली आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल गल्लीतले आमदार अशी भाषा करतात तरी राज्यातील – देशातील पोलीस प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. राज्याचे पोलीस प्रशासन गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीतील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Story img Loader