गडचिरोली : राज्य शासनाने नुकतीच तलाठी आणि वनरक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यात गैरआदिवासी समाजाला नगण्य जागा दिल्याने सरकार दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारने नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तलाठी आणि वनरक्षक पदाकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. परंतु तलाठी पदाकरीता जाहीर १५८ जागांमध्ये गैरआदिवासी समाजाकरीता केवळ ७ जागा देण्यात आल्या आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गैरआदिवासी उमेदवारांची निराशा झाली आहे. सोबतच भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते. परंतु, तसे न केल्याने जिल्ह्यातील बेरोजगारांची संधी हिरावली जाणार आहे.
हेही वाचा >>>फडणवीसांच्या जिल्ह्यातच जलयुक्त शिवारची कामे अर्धवट, शेतकऱ्यांना फटका
राज्य सरकारला हे ठाऊक असूनही आदिवासी आणि गैरआदिवासींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशाप्रकारची जाहिरात काढली काय, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्यामुळे तत्काळ या जाहिरातीत सुधारणा करून जिल्ह्यातील सर्व समाजातील उमेदवारांना संधी देण्यात यावी. अशी मागणी ब्राम्हणवाडे यांनी पत्रकातून केली आहे.