अकोला : विविध प्रश्न व समस्यांनी घेरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासह महायुतीने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महायुती सरकार दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणार आहे की ती केवळ जुमलेबाजी होती, असा सवाल करीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.  

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केले. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. राज्यातील महायुती सरकारने निवडणूक काळात जाहीरनाम्यासह जाहीर सभांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासोबतच अनेक आश्वासने दिलेली आहेत, मात्र त्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्याकडे राज्य शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांद्वारे उत्पादित मालाला योग्य आधारभूत किंमत मिळत नाही. वेळोवेळी शेतमालाची निर्यात बंदी व अनियंत्रित आयातीमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. एकीकडे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढला असून उत्पादित माल पडलेल्या भावात विकावा लागतो. शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असून नैराश्येतून बळीराजा आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलत आहेत. सरकारला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याची टीका काँग्रेसने केली. 

जीएसटी शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत आहे. तो तत्काळ हटवणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांनी ‘जुमलेबाजी’ बंद करावी व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवावे, निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी, खुल्या बाजारात कमी किंमतीत विकलेल्या सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा या पिकांना भावंतर योजना जाहीर करावी, शेतकऱ्यांना लागणारे खते, बी-बियाणे, कीटकनाशके व अवजारे आदींना जीएसटी मुक्त करावे आदी मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.

राज्य शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन बळीराजाला दिलासादायक असे निर्णय घ्यावे, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी महापौर मदन भरगड, विजय कौसल, निखिलेश दिवेकर, विजय देशमुख आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader