नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च झाला. २०१५ मध्ये या दौ-यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाले होते.मात्र जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही तर चार्टर्ड विमानवाल्याचे आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली .
हेही वाचा >>> आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी वंदे भारतचा विस्तार, नागपूरहून भोपाळमार्गे इंदूरला जाणार
लोंढे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्विस प्लेनचे तिकीट काढून दावोसचा दौरा ठरवला होता का व पंतप्रधानांचा दौरा अचानक ठरला म्हणून ती तिकिटे रद्द करुन चार्टर्ड विमान केले ?, पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो -३ च्या उद्घाटनाचा दौरा अचानक ठरला का ? आमच्या माहितीप्रमाणे १९ जानेवारीला पंतप्रधान आले होते. मग १ कोटी ६० लाख रुपये चार्टर्ड विमानावर खर्च केले, इतर खर्च १.५ कोटीपेक्षा जास्त केला,जाहिरातीवरही खर्च केला. सगळे खर्च दुप्पट तिप्पट केले. व्यासपीठासाठी १० कोटी खर्च येईल असे सांगून प्रत्यक्षात मात्र १६ कोटी रुपये खर्च केले. ही जनतेच्या पैशाची लुट आहे. शिंदे सरकार सामान्य माणसाचे नाही, विशिष्ट लोकांचे आहे, ते रिक्षावाल्यांचे नाव सांगतात पण प्रत्यक्षात चार्टर्ड विमानवाल्यांचे सरकार आहे व याचा चालकही चार्टर्ड विमानाचा चालकच आहे.