नागपूर : सात दशकांपूर्वी देशातून चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठी कोणतेही रचनात्मक प्रयत्न केले गेले नाहीत, असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात नुकतेच केले होते. त्याला माजी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री जयराम रमेश यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाला लिहिलेले पत्र ट्विटरवर जाहीर करत २००९ मध्येच ‘चित्ता प्रकल्पा’ची सुरुवात झाल्याचे म्हटले आहे.

मोदी यांच्या वाढदिवशी शनिवारी, १७ फेब्रुवारीला मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते सोडून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मोदी म्हणाले, १९५२ मध्ये भारतातून चित्ते नामशेष होऊनही मागील सरकारने त्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आम्ही नव्या ताकदीने भारतात चित्ता पुररुज्जीवित करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला. त्यावर जयराम रमेश यांनी पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

२००९ मध्ये ते केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री असताना त्यांनी ‘वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’चे एम.के. रणजितसिंह यांना पत्र लिहिले होते. चित्ता भारतात पुन्हा स्थापित करण्यासाठी आराखडा तयार करण्यास व संभाव्य ठिकाणांचे तपशीलवार विश्लेषण करण्यास सांगितले होते.

सिंह स्थलांतरित करायला हवे होते’ 

काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. गुजरातमधील गीर अभयारण्यातील सिंहांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी याला नकार देण्यात आला. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आफ्रिकेतून चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले, असा आरोप कमलनाथ यांनी केला. 

Story img Loader