अमरावती : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी सतराव्या फेरीअखेर २४ हजार ३८२ मतांची आघाडी घेतलेली असताना भाजपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीची मागणी केली आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे निवडणूक प्रतिनिधी विनोद गुहे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला आहे. अद्याप या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला, तरी त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
मतमोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली, तरी अधिकृत निकाल जाहीर होण्यास उशीर लागत असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत सोळाव्या फेरीपर्यंतचे अधिकृत निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सतराव्या फेरीअखेर नवनीत राणा यांना ४ लाख ६७ हजार ६८७ मते मिळाली आहेत, तर बळवंत वानखडे यांना ४ लाख ९२ हजार ६९ मते प्राप्त झाली आहेत. बळवंत वानखडे यांचे मताधिक्य हे २४ हजार ३८२ इतके आहे.
हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरी यांनी नातवंडासह केला जल्लोष
नवनीत राणा आणि बळवंत वानखडे यांना मिळालेल्या मतांचा फरक फार जास्त नसल्याने मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही बाबी आम्हाला सुस्पष्ट न झाल्याने उमेदवार नवनीत राणा यांच्या वतीने निवडणूक प्रतिनिधी म्हणून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पुन्हा पार पाडावी, फेर मतमोजणी करावी, अशी विनंती नवनीत राणा यांचे निवडणूक प्रतिनिधी विनोद गुहे यांनी अर्जात केली आहे. अद्याप या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली खरी, पण चौथ्या आणि पाचव्या फेरीत नवनीत राणा यांनी मताधिक्य नोंदवले. पाचव्या फेरीपासून अकराव्या फेरीपर्यंत पुन्हा बळवंत वानखडे यांनी आघाडी टिकवून ठेवली. तेराव्या आणि चौदाव्या फेरीत नवनीत राणा या आघाडीवर होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली, पण नंतरच्या फेऱ्यांमध्ये बळवंत वानखडे यांनी मताधिक्य टिकवून ठेवले.