नागपूर : भाजप नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपुरात भाजपकडून विधानसभेच्या सगळ्याच जागा जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावण्यात आला आहे. त्यातच मध्य नागपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवीण दटकेंच्या प्रचार कार्यालयात सोमवारी येथील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके अचानक धावत गेले. आत गेल्यावर बंटी यांनी केलेल्या कृतीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सर्व पक्षांसह अपक्ष उमेदवारही नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी, महायुती आणि इतर पक्षाच्या नेत्यांकडून आता पूर्ण ताकद लावली जात आहे. या काळातील निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच उमेदवार व नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही.

हेही वाचा >>>भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला

दरम्यान मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या सोमवारच्या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बंटी शेळके यांची प्रचार यात्रा सोमवारी मध्य नागपूर मतदारसंघातील लाकडी पूल, आयचित मंदिर परिसरातून जात होती. दरम्यान त्यांची नजर येथील भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचार कार्यालयावर पडली. येधील द्वारावर काही भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतरही शेळके यांनी प्रथम तेथील द्वारावरील भाजपच्या कार्यकर्त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर ते थेट कार्यालयाच्या आत गेले. तेथे त्यांनी उपस्थित सर्व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत त्यांचीही गळाभेट घेतली. याप्रसंगी बंटी शेळके तेथील उपस्थितांना म्हणाले, ‘माझा लढा कुणा व्यक्तीसोबत नाही. मी एका विशिष्ट विचाराविरोधात लढत आहे. मध्य नागपूर अथवा इतर कोणत्याही भागात कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीसाठी मी सदैव काम करत राहील’. हे चलचित्र त्यांनी समाजमाध्यमांवरही शेअर केले. त्यानंतर या पोस्टवर मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रियाही आल्या.

हेही वाचा >>>रणरागिनी… पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीपेक्षा दुप्‍पट महिला उमेदवार रिंगणात

कुणी म्हणतो सकारात्मक राजकारण, कुणी म्हणतो…

बंटी शेळके यांनी भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या कार्यालयात स्वत: गेल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यावर एकाने लिहले हे सकारात्मक राजकारणाचे प्रतीक आहे. दुसऱ्याने लिहिले आजच्या बिघडलेल्या वातावरणात या कृतीने सगळ्याच नेत्यांकडे एक सकारात्मक संदेश गेला आहे. तिसऱ्याने लिहिले आजच्या द्वेषपूर्ण निवडणूकीच्या वातावरणात ही कृती सर्वच उमेदवारांच्या डोळ्यात चांगल्या राजकारणाबाबत सकारात्मक संदेश देऊन जाते.  काहींनी हा प्रकार चमकोगिरीचा असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress candidate bunty shelke in central nagpur at bjp office during campaigning mnb 82 amy