नागपूर : मध्य नागपूर मतदारसंघात बुधवारी मतदानाच्या रात्री निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना चांगलेच महागात पडले. पोलिसांनी शेळकेंसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा, तोडफोड, धमकावणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे. याप्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून बंटी शेळके यांना अटक होण्याची शक्यता होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडले होते?

२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अतिरिक्त ईव्हीएम नेणारे वाहन किल्ला परिसरातील बुथबाहेर निघाले. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबवली. त्यांनी शिवीगाळ करत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी (एमएच १९, बीयू ६०२७) ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सनी कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले. तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले. परिसरात ही बातमी पसरताच भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आणि त्यानंतर रात्री जोरदार बाचाबाची झाली. ईव्हीएमसोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत झोन अधिकारी हुमैद नाजीर खान यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांना नियमानुसार राखीव ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले होते. त्यांच्या वाहनात ते ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजता मतदानाच्या अहवाल फॉर्मची झेरॉक्स प्रत घेण्यासाठी ते बुथवरून वाहनातून निघाले. कल्याणेश्वर मंदिर ते झेंडा चौकादरम्यान झेरॉक्स सेंटर पाहून खान थांबले. तेथे हा प्रकार घडला. खान यांनी शेळके यांना नेमके तथ्यदेखील सांगितले. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

हेही वाचा…प्रदूषण कराल तर खबरदार! वीज केंद्राला बँक गॅरंटी जप्ती व संच बंदची नोटीस…

या अटीवर दिला जामीन

बंटी शेळके यांनी याप्रकरणी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम..एस.कुळकर्णी यांच्या खंडपीठासमक्ष याप्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व बाबी लक्षात घेता बंटी शेळके यांचा ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तपास अधिकाऱ्यांने बोलवल्यावर हजर राहणे, याप्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या कुणालाही धमकी देऊ नये यासह न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये या अटी ठेवण्यात आल्या आहे. याप्रकरणावर पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress candidate bunty shelke suffered election commission vehicles vandalized on polling night tpd 96 sud 02