नागपूरची नावे शेवटी जाहीर होण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार निवडायला दिल्लीत सुरू असलेल्या छाननी समितीच्या बैठकीत नागपुरातील उमेदवारांच्या नावावर पक्षनेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने ही नावे शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटप झाल्यावर बुधवारी दिल्लीत ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या अध्यक्षतेत छाननी समितीची बैठक झाली. बैठकीत मुंबई तसेच राज्यातील इतर विभागातील प्रमुख मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यावेळी काही निवडक मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, ती जाहीर करण्यात आली नाही. नागपूरसह विदर्भातील उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली. काही मतदारसंघात एकमत झाले. मात्र नागपूरच्या सहा जागांवर एकाहून अधिक दावेदार असल्याने आणि नेत्यांमधील मतभेद शिगेला पोहोचल्याने उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे उद्या गुरुवारी पुन्हा बैठक होणार असून त्यात चर्चा केली जाणार आहे.
दोन दिवसांपासून नेते दिल्ली मुक्कामी
नागपुरातील अनेक नेते व त्यांचे समर्थक दोन दिवसांपासून उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी मंगळवारी व बुधवारी दिवसभर दिल्लीत विविध नेत्यांची भेट घेतली. उत्तर नागपुरातील उमेदवारीसाठी इच्छुकांनी ज्योतिदिरात्य सिंधीया, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राजीव सातव यांची भेट घेतली.