अमरावती : मेळघाटात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. काँग्रेसने डॉ. हेमंत चिमोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दहा वर्षांनंतर काँग्रेस पक्षाला या ठिकाणी लढत देण्याची संधी मिळाली आहे. यावेळी काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसमधून आलेल्या केवलराम काळे यांना उमेदवारी दिली. महायुतीच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले आमदार राजकुमार पटेल यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणी स्थान मिळू शकले नाही.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. हेमंत चिमोटे यांचा परतवाडा येथे वैद्यक व्यवसाय आहे. त्यांच्यासह मन्नालाल दारसिंबे, रवी पटेल, दयाराम काळे, राम चव्हाण हे काँग्रेसच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत होते. काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा लांबल्याने इच्छुकांची अस्वस्थता वाढली होती. काल रात्री उशिरा काँग्रेसने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

हेही वाचा – नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी

भाजपचे उमेदवार केवलराम काळे यांनी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या निवडणुकीत त्यांना अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. १९९५ पर्यंत मेळघाट हा काँग्रेसचा गड होता. १९९५ च्या निवडणुकीत भाजपचे पटल्या गुरुजी यांना मतदारांनी संधी दिली. त्यानंतर राजकुमार पटेल हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. २००९ मध्ये केवलराम काळे काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदार बनले. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने केवलराम काळे यांना पुन्हा उमेदवारी दिली पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. राजकुमार पटेल यांनी प्रहार जनशक्ती पक्ष सोडल्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण त्यांचा पक्ष प्रवेश लांबत गेला. आणि ही जागाही त्यांच्या हातून निसटली. आता महायुती आणि महाविकास आघाडी ही दोन्ही दारे त्यांच्यासाठी बंद झाली आहेत. आता ते कोणता पक्ष निवडतात किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत लढत देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

v

हेही वाचा – भाजपचे अखेर ठरले, पश्चिम- सुधाकर कोहळे, उमरेडमधून सुधीर पारवे लढणार

मेळघाटात काँग्रेस आणि भाजप यांच्यात पारंपरिक लढती पाहायला मिळाल्या आहेत. पण भाजप, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्ष असा प्रवास करून आलेल्या राजकुमार पटेल यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसतर्फे डॉ. हेमंत चिमोटे आणि भाजपतर्फे केवलराम काळे हे लढतीत असणार आहेत.