भंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विविध मतदारसंघात उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. मात्र भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केली नाही. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण या एकाच विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर दररोज नवनवीन नावांचा शोध लावला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

भाजपमध्ये दोन इच्छुकांमध्ये रस्सीखेच चालली असतानाच काल मुंबई येथे झालेल्या बैठकीत काँगेसने भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी तीन नावे निश्चित केली असून यातील एका उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लाखनीचे डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जि.प. सदस्य मोहन पंचभाई ही तीन नावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे या तीन नावांपैकीच काँगेसचा एक उमेदवार असणार हे मात्र निश्चित. दरम्यान जयश्री बोरकर या महिला उमेदवाराच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस तरी महिलांना संधी देईल का हे ही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – भंडारा-गोंदियात ‘जातकारण’ तापले

भाजपाकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री परिणय फुके, संजय कुंभलकर, हेमंत पटले, विजय शिवणकर, ब्रम्हानंद करंजेकर, आमदार विजय रहांगडाले यांची नावे चर्चेत असली तरी खासदार सुनील मेंढे आणि परिणय फूके या दोन नावांभोवतीच सध्या चर्चेचे वर्तुळ आहे. मात्र दोन्ही जिल्ह्यात विखुरलेल्या कमळांच्या पाकळ्यांमुळे काँग्रेसचा हात बळकटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे भाजपाचा व महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार, उमेदवार म्हणून कुणाचे ठरलयं अन् कुणाचे बिघडलयं, स्थानिकांना संधी मिळणार की अन्य उमेदवार लादला जाणार, याबाबत मतदारसंघातील मतदारांना उत्सुकता लागली आहे.

विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांनी मागील वर्षभरात मतदारांची मन जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून त्यांची रथयात्रा आणि कामगारांना पेटी वाटप यामुळे मतदारांच्या पसंतीस उतरतील का हे कळेलच!! मात्र भाजपला भंडारा गोंदिया गड राखायचा असेल तर कुणबी आणि तेली समाजाची मते या मतदारसंघात जवळपास असल्याने कुणबी समाजाचा स्थानिक उमेदवार या कारणाने विद्यमान खासदार मेंढे यांचा भाजपला पुन्हा विचार करावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भंडारा लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी देखील उमेदवारी मिळावी म्हणून डावपेच सुरू केले असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, बाहेरच्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीतील इतिहास बघता त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणे जवळपास दुरापास्तच ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या खास मर्जीतील व जनसामान्यांमध्ये कोरोना काळात देवदूत ठरलेले लाखनीचे गरीबांचे डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबईच्या बैठकीत डॉ. निंबार्ते यांचे नाव महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून समोर आले आहे. महाविकास आघाडीने निंबार्ते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. त्यामुळे डॉ. चंद्रकांत निंबार्ते या मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. मात्र अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आणि निःस्वार्थ काम करणारे मोहन पंचभाई यांनासुद्धा डावलून चालणार नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा…

लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाची उमेदवार निश्चिती नसली तरी भंडारा – गोंदिया भागाचा सर्वांगीण विकास साधणारा उमेदवार देण्यात यावा, अशी मतदारांची अपेक्षा आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्न अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. अनेकदा पाठपुरावा करूनही गेल्या पंचवार्षिकमध्ये या भागाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच झाल्याच्या जनतेच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी असलेला उमेदवार असावा, असे जनतेला वाटते आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड कोणत्या निकषांवर होते, ते पाहावे लागणार आहे.

Story img Loader