वर्धा : देशात सर्वात मोठा भाजपविरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची नाव राजकारणात गटांगळ्या खात असल्याचे बोलल्या जाते. केंद्रात दहा वर्षांपासून सत्ता नाही आणि अनेक राज्यातून सत्ता निसटलेली. अशी स्थिती असल्याने सामान्य निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्ता द्विधा मनस्थितीत असल्याची चर्चा होते. बड्या नेत्यांनी केव्हाच भाजपची वाट धरली असल्याच्या पार्श्वभूमीवर शिल्लक नेत्यांची हिंमत वाढविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढाकार घेतला आहे. आता त्यांनी कांग्रेसच्या देशभरातील ७००वर जिल्हाध्यक्ष यांना चर्चेस बोलावले आहे.
टप्प्याटप्प्याने राज्यनिहाय अश्या बैठकी होणार. ३ एप्रिलला दुपारी ३ वाजता दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या इंदिरा भवन या मुख्यालयात येथे ही बैठक होत आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश, छ्तीसगड, दिल्ली, राजस्थान, पंजाब व चंदीगड या ९ राज्यातील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
संगठनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे प्रभारी के. सी. वेणूगोपाल यांनी एका पत्रातून सूचित केले आहे. तर या बैठकीस हजेरी आवश्यक, अशी तंबी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पत्रातून दिली.ही अत्यंत महत्वाची बैठक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय व प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेचे पत्र भेटल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी दुजोरा दिला आहे.
संघटना मजबूत करण्यासाठी एक एक पाऊल टाकल्या जात आहे. त्याच दृष्टीने पडलेले हे पहिले पाऊल म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने दिली. तीन टप्प्यात देशातील सातशेवर जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या बैठका पार पडतील. आगामी काळात जिल्हाध्यक्ष हा पक्षीय कार्यात केंद्रबिंदू राहणार. त्यास निवडणूक समितीत स्थान राहणार. तसेच तिकीट वाटपात त्याचे मत विचारात घेतल्या जाणार, असा बदल होणार. तळपातळीवार पक्षची ताकद वाढविण्याची मुख्य भूमिका राहणार आहे.
आगामी काळात २०२७ मध्ये गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका नियोजित आहे. त्या दृष्टीने पायलट प्रोजेक्त राबविल्या जाणार असून जिल्हाध्यक्ष काय भूमिका घेऊ शकतो, यावर सूचना असतील. काँग्रेस हा अजूनही देशातील मुख्य व सर्व राज्यात अस्तित्व राखून असलेला पक्ष आहे. कार्यकर्त्यांना हिंमत देत सक्रिय करण्याची गरज मांडली जाते. जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या या बैठकीत त्यादृष्टीने मार्गदर्शन होणार असल्याचे समजते.