गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर राजीनामा देणार, त्यामुळे पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल, असं त्यांनी सांगितले आहे. यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले की, भाजपला वाटत होतं की इथले आम्हीच राजे आहोत. पण महाराष्ट्रातील जनतेने भाजपला नाकारलं आहे.
हेही वाचा >>> भंडारा : भाजपनेच भाजप उमेदवाराला तोंडघशी पाडले, आगामी विधानसभेसाठी धोक्याची घंटा
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा किंवा नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण,जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली आहे. असे मत महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते आज त्यांच्या गृहग्राम सुकडी येथे वाढदिवसानिमीत्त असलेल्या कार्यक्रमात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. ते म्हणाले की, जनता भाजपचा मागील १० वर्षांचा कार्यकाळ पाहून पूर्णत: वैतागली आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यातील गंभीर होत असलेले बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या सोबतच हापुरुषांचा अपमान, जाती जातीत लावलेले भांडण या सर्व बाबींमुळे नाराज असलेल्या राज्यातील जनतेने यांना त्यांची जागा दाखवली आहे, असे पटोले म्हणाले.