संजय मोहिते, लोकसत्ता
बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आल्याने नवसंजीवनी लाभलेल्या राष्ट्रीय काँग्रेसने आता ‘भारत जोडो’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र जोडो’ अभियान राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून राज्यात ‘लोकसंवाद पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसने जय्यत तयारी चालविली असून ६ महसूल विभानिहाय समन्वयक नेमण्यात आले आहे.
राजधानी दिल्ली व नंतर मुंबईत पार पडलेल्या बैठकानंतर ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान काढण्यात येणाऱ्या लोकसंवाद पदयात्रेची रूपरेषा निश्चित करण्यात आली. पदयात्रेची जवाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. कोकण विभागसाठी जिल्हानिहाय समन्वयक नेमण्यात आले असून वरील प्रमुख नेत्यांवर प्रत्येकी एका जिल्ह्याची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा >>> केंद्रीय गृहमंत्र्यांनी कलावती बांदूरकर प्रकरणी लोकसभेत खोटी माहिती दिली’, विजय वडेट्टीवार आक्रमक
विभाग समन्वयकांची नेमणूक
लोकसंवाद पदयात्रेसाठी महसूल विभागनिहाय समन्वयक नेमण्यात आले असून त्यामध्ये प्रदेश पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर विभाग- नाना गावंडे, अमरावती- संजय राठोड, मराठवाडा- अभिजित सपकाळ, उत्तर महाराष्ट्र- शरद अहेर, पश्चिम महाराष्ट्र- अभय छाजेड, ठाण्याची जवाबदारी राजेश शर्मा, पालघर रामचंद्र दळवी, रायगड रमाकांत म्हात्रे, सिंधुदुर्ग शशांक बावचकर, तर रत्नागिरीची जवाबदारी हुसेन दलवाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नेत्यांनी संबधित जिल्हाध्यक्ष, आजी-माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, यांच्याशी समन्वय व चर्चा करून पदयात्रेची रूपरेषा १५ ऑगस्ट पर्यंत कळवायची आहे.
हेही वाचा >>> गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील भविष्यातील प्रकल्पांसाठी पाण्याचे नियोजन, वनमंत्र्यांकडून योजनेस मंजुरी
उद्देश अन् नियोजन ही पदयात्रा ऐतिहासिक वा धार्मिक स्थळापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. यात्रेच्या मार्गावर झेंडे, कमानी, फलक लावण्यात येणार असून सभांच्या ठिकाणी नेते व पदयात्रिंचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. ‘भारत जोडो’प्रमाणेच ही यात्रा निर्धारित मार्गानेच जाणार आहे. भरमसाठ आश्वासने देत सत्तेत आलेल्या केंद्र सरकार व फोडाफोडी करून राज्यात सत्तेवर आलेल्या राज्य सरकार विरुद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे. ही सरकारे सर्व पातळीवर अपयशी ठरल्या ने जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण, ईडी-सीबीआयची मनमानी, जातीय दंगली, यामुळे जनतेत निर्माण झालेल्या असंतोषला वाचा फोडणे व काँग्रेस सर्व संकटात जनतेसोबत आहे, हे दाखवून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.