लोकसत्ता टीम
बुलढाणा: माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेसह काही पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याने आज चिखली शहरात खळबळ उडाली. या घटनेची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यासंदर्भात रुग्णालयात उपचार घेणारे श्याम वाकदकर यांनी सांगितले की, आज शुक्रवारी ते मुलाला दहावीच्या परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गेले होते. ते शिवाजी विद्यालयासमोर मुलासह उभे असताना तिथे माजी आमदार राहुल बोंद्रे कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विरोधात फेसबुकवर काय पोस्ट टाकली, अशी विचारणा केली. यानंतर त्यांनी माझा मोबाईल फेकून दिला. मी पळालो असता सर्वांनी पाठलाग करून मारहाण केल्याचा आरोप वाकदकर यांनी केला आहे. या घटनेची तक्रार पोलिसांना दिली असल्याचे वाकदकर यांनी सांगितले.
आणखी वाचा- वर्धा : महाविकास आघाडी आता जनतेच्या न्यायालयात विभागनिहाय जाहीर सभांचे नियोजन
दरम्यान, राहुल बोन्द्रे यांनी मारहाण का केली याचे कारण त्यांनाच विचारा’ अशी प्रतिक्रिया बोन्द्रे यांनी दिली. वाकदकर यांनी मागील काळात फेसबुकवर अनेकदा आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकल्या आहेत. नुकतेच निधन झालेल्या माझ्या वडिलांबद्दल ( स्व. तात्यासाहेब बोन्द्रे ) त्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली. दुर्देवाने काही जण त्याचे समर्थन करीत आहे. आजची घटना किरकोळ आहे, भविष्यात वाकदकर सारख्या प्रवृत्तींचे समर्थन करणाऱ्यांना देखील याचा सामना करावा लागू शकतो, असा गर्भित इशाराही बोन्द्रे यांनी यावेळी दिला.