नागपूर जिल्हा परिषद समिती सभापतींच्या निवडणुकीत कामठी विधानसभा मतदार संघातील अवंतिका लेकुरवाळे, उमरेड विधानसभा मतदारसंघातील मिलिंद सुटे, रामटेक मतदार संघातील राजकुमार कुसुंबे व काटोल मतदारसंघातील प्रवीण जोध हे निवडून आले.मंगळवारी सभापतीपदासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपने पुष्पा चाफले, सुभाष गुजरकर, सतीश डोंगरे, राधा अग्रवाल व प्रणीता दंडारे यांचे अर्ज दाखल केले होते. परंतु, राधा अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतला. ५२ सदस्यांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला. सहा सदस्य अनुपस्थित होते. विशेष म्हणजे, सभापतीपदाचे उमेदवार देताना काँग्रेसने सर्व सदस्यांना जंगलसफारी घडवून, फार्म हाऊसवर एकत्र ठेवले. शेवटपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘मनरेगा’ आयुक्तालयातच ५२ टक्के पदे रिक्त

सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते. काँग्रेसने नावे जाहीर करताच काहींना धक्का बसला. यावर काहींनी नाराजीही व्यक्त केली. रामटेक विधानसभा मतदारसंघातून दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु राजकुमार कुसुंबे यांना संधी देण्यात आली. कुसुंबे हे सुनील केदार यांचे विश्वासू असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत सर्व विजयी उमेदवारांना ३८ मते मिळाली. पराभूत उमेदवारांच्या पारड्यात १३ मते पडली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे नाना कंभाले व प्रीतम कवरे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. काँग्रेसच्या मेघा मानकर सभागृहात उपस्थित होत्या. भाजपकडून त्यांचा अर्जही भरण्यात येणार होता. पण त्यांनी सभागृहात तटस्थ भूमिका घेतली. निवडणुकीनंतर सर्व विजयी समिती सभापतींच्या समर्थकांनी जिल्हा परिषदेत जल्लोष केला.

हेही वाचा >>>मिहानमध्ये तोरणा कंपनीला जमीन देण्यास मान्यता ; प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने तातडीने निर्णय

मेघा मानकर तटस्थ
समिती सभापतीच्या निवडणुकीत सहा सदस्य अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसचे नाना कंभाले. प्रीतम कवरे आणि शंकर डडमल, भाजपचे आतिश उमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख आणि शिवसेनेचे संजय झाडे यांचा समावेश आहे. मेघा मानकर सभागृहात उपस्थित होत्या पण त्या तटस्थ राहिल्या.

हेही वाचा >>>‘एमपीएससी’ उत्तीर्ण होऊनही नियुक्ती नाही ; स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांमध्ये संताप

कुमरेंची नाराजी
काँग्रेसचे दुधराम सव्वालाखे, अरुण हटवार, शांता कुमरे व नाना कंभाले हे ज्येष्ठ सदस्य असताना या चारही सदस्यांना डावलण्यात आले. शांता कुमरे यांना सभापतीपद देण्याबाबत निश्चित झाले होते. मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना डावलून मिलिंद सुटे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे कुमरे यांनी पक्षातंर्गत नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा >>>वनखात्यासमोर यंदा व्याघ्रगणनेचा पेच ; सुरक्षेची हमी दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांची सहभागाची तयारी

आमच्याकडे बहुमत होते. त्यामुळे काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे चारही सभापती निवडून आले. जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेसचे जे सदस्य अनुपस्थित होते त्यांची तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार आहे. – अवंतिका लेकुरवाळे, नवनिर्वाचित सभापती.

या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी मंत्री सुनील केदार यांनी ज्येष्ठ सदस्यांना डावलून आपल्या जवळच्यांना संधी दिली. त्यामुळे माझ्यासह प्रीतम कवरे यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार घातला. जिल्ह्यात एका नेत्याच्या वर्चस्वामुळे अख्ख्या पक्षात नाराजी आहे. प्रदेशाध्यक्षांपर्यंत तक्रारी करूनही सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जात नाहीत. – नाना कंभाले, सदस्य, काँग्रेस.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress dominates nagpur district council subject committees amy