नागपूर : ओबीसी समाजातील विविध जातीच्या अस्मिता जागृत झाल्या असून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या अस्मितांना फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, काँग्रेसची विदर्भातील लोकसभेच्या संभावित उमेदवारच्या नावे बघितल्यास कुणबी आणि मराठा समाजाच्या नेत्यावर भर असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात ओबीसीमध्ये कुणबी नंतर तेली आणि माळी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. २०१९ च्या निवडणुकीत काही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला एकगठ्ठा मतदान झाले होते. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. भाजप नेहमी सामाजिक अभिसरण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. त्यांनी यावेळी देखील वर्धा येथून रामदास तडस यांना उमेदवारी देऊन ते सिद्ध केले. पण, काँग्रेस मात्र कुणबी आणि मराठा यांच्यापुढे फार विचार करताना दिसत नाही. काँग्रेसमध्ये अद्याप उमेदवार निश्चित व्हायचे आहे. पण, जी नावे चर्चेत आहेत ती सर्व कुणबी आणि मराठा समाजातील आहेत. कुणबी हे ओबीसीमधील असले तरी आणखी शेकडो जाती ओबीसीमध्ये आहेत. विदर्भात प्रामुख्याने तेली, माळी यांची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. त्यांच्याकडे काँग्रेसचे लक्ष नाही.
हेही वाचा >>> बाळासाहेबांच्या सेनेला ‘बाळासाहेबांची’ धास्ती! भूमिकेकडे आघाडीचे लक्ष
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ओबीसींचे मोठे आंदोलन राज्यात उभे राहिले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या आंदोलनात पुढाकार घेतला होता. कुणबी सोबत तेली, माळी आणि ओबीसीतील इतर जातींनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. या समाजातील जातीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभेचे उमेदवारी देताना सामाजिक अभिसरणाचा मुद्दा काँग्रेसने लक्षात घ्यायला हवा. जो भाजप नेहमी घेते.
हेही वाचा >>> जेव्हा सरकारी वकीलालाच करावा लागला सरकारचा विरोध, उच्च न्यायालयात घडला मजेदार प्रसंग…
काँग्रेसच्या लोकसभेच्या संभावित उमेदवारांमध्ये एकही तेली किंवा माळी उमेदवाराचे नाव चर्चेत नाही. जे काही स्क्रिनिंग करून नावे गेल्याचे कळते, त्याच्यामध्ये तेली, माळी किंवा इतर जातीमधील नेत्याची नावे नाहीत. भंडारा जिल्ह्यात नाना पटोले, चंद्रपूर जिल्ह्यात सुभाष धोटे, प्रतिभा धानोकर आहे. वर्धेत हर्षवर्धन देशमुखचे नाव चर्चेत आहे. त्याशिवाय कोणतेच नाव चर्चेत नाही. अमरावती विभागात माळी समाजाची मते बरीच आहेत. त्या भागात एकही नाव माळी समाजाचे नाव चर्चेत नाही. ओबीसीमध्ये बऱ्याच छोट्या-मोठ्या जाती आहेत. केवळ कुणबी आणि मराठा समाजाला नेत्यांचा उमेदवारीसाठी विचार करू चालणार नाही. असे झाल्यास पुन्हा पायावर धोंडा मारून घेण्याची वेळ काँग्रेसवर येण्याची शक्यता आहे असे चित्र आहे.
“काँग्रेस आधीपासून सामाजिक अभिसरणच साधत आहे. पक्षात महिला, ओबीसी, एसटी, एसटी, अल्पसंख्याक यांचे प्रतिनिधीत्व नेहमीच राहिले आहे. काँग्रेसमध्ये सर्व घटकांना संधीसोबत अधिकार दिले जाते. भाजपसारखे नाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत आणि सर्व घोषणा देवेंद्र फडणवीस करतात. लोकसभा असो की विधानसभा विजयी होण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक समाजातील घटकाला संधी आमच्या पक्षात दिली जाते.” -अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ता, महाराष्ट्र काँग्रेस.