वर्धा : मला लोकसभा निवडणूक लढायचीच नाही इथून सूरू झालेला काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा प्रवास आता काँग्रेस सोडून थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हवर लढण्यापर्यंत पोहचला आहे. पक्षाच्या सहकारी, कार्यकर्ते, नेते यांना भेटून सांगतो, असे काळे काल बोलले.
परंतु, आज त्यांनी तुतारीवर लढायचे आहे, असे थेटच सांगितले. आता अधिकृत घोषणा शरद पवार हे धूळवड आटोपल्यावर करतील. उद्या काळे हे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात परत चर्चा करणार आहेत. याबाबत थेट विचारल्यावर ते म्हणाले की, तुतारी वर लढूच नका असे म्हणणारे माझे सहकारी आता या निर्णयास तयार झाले आहेत. त्यांना निर्णय पटला. राजकारणात हे चालणारच.
हेही वाचा…रामटेकमधून काँग्रेसच्या रश्मी बर्वे निवडणूक लढणार?
तुतारी का असेना आपलाच माणूस लढणार, याचा काँग्रेस नेत्यांना आनंदच आहे, अशीही मल्लिनाथी त्यांनी केली. या निमित्याने काळे कुटुंबाचा ३६० कोनातील राजकीय प्रवास पूर्ण झाला आहे. त्यांचे वडील डॉ. शरद काळे हे शरद पवार यांच्यातर्फे लढले. पण शिवचंद चुडीवाले यांनी त्यांचा पराभव केला. पुढे ते पुन्हा ते शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे १९८४ मध्ये लढले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार श्रीधर ठाकरे यांचा ४५६ मतांनी पराभव केला होता.
पुढे डॉ. काळे यांनी काँग्रेसतर्फे लढून आमदारकी प्राप्त केली. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अमर काळे हे प्रथम पोटनिवडणुकीत विजयी झाले. नंतर ते काँग्रेसचे आमदार झाले. आता परत काळे कुटुंबात तब्बल ५० वर्षानंतर शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढली जाणार आहे.