नागपूर : नागपुरातील हिंसाचाराचा घटनाक्रम बघता सरकार दुजाभाव करीत असल्याचे दिसून येते. नागपुरात कधीही अशी हिंसक घटना घडली नाही. नागपुरातील लोक शांतप्रिय आहेत. राज्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल निदर्शन करत आहेत. आणि अशांतता निर्माण करत आहेत. त्यात भाजपचे नेते वादग्रस्त, प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत.
सरकारमधील लोकही बेछुट विधान करत आहेत. राज्य सर्वांना समानता राखून न्याय देण्याची ज्यांची जबाबदारी आहे. तेच लोक कायदा आणि सुव्यवस्था उदध्वस्त करत असल्याचे चित्र आहे, असे काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. काँग्रेसची सत्यशोधन समिती आज नागपुरात होती. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर झालेल्या हिंसाचारासाठी एका विशिष्ट समाजाला दोष देणारे वक्तव्य करतात. भाजपचे नेते, सरकारमधील मंत्री कायदा-सुवस्था बिघडवून शकतील, असे वक्तव्य करतात. त्यांनी जणून चिथावणीचा कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे माणिकराव ठाकरे यांनी केला.
राज्य सरकारची प्रमुख जबाबदारी कायदा आणि सुवस्था राखण्याची आहे. सर्व जाती, धर्माच्या लोकांना सुरक्षित ठेवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री दंगल घडवण्याचे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचे म्हणतात. हे जर षडयंत्र असेलतर त्यांचे पोलीस खाते काय करत होते. हे सरकार राज्य कारभार चालवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त करावी, असेही ठाकरे म्हणाले.
नागपूरच्या दंगलीस जबाबदार कोण आहे. या दंगलीनंतर मुस्लीमांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लीमांसाठी पवित्र ‘आयत’ असलेली चादरीची विंटबना केली आणि जाळली. मुस्लीमांना चिथावणी देण्याचे काम व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांच्यावर किरकोळ गुन्हे दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले.
पोलीस आणि त्या कार्यकर्त्यांचे प्रेमाचे नाते आहे. त्यामुळे त्यांनी ते स्वत:हून पोलीस ठाण्यात आल्यावर किरकोळ गुन्हे दाखल केले आणि सोडून दिले. मात्र मुस्लीमांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चादर जाळणाऱ्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी आणि त्यासंदर्भात प्रक्षोभक वक्तव्य भाजप, व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या लोकांकडून केले जात होते. परंतु त्यावर कोणतीही प्रतिक्रिया मुस्लीम समाजाने दिली नाही. अशा स्थितीत नागपूर पोलिसांनी मोर्चा काढण्याची परवानगी कशी दिली. पोलिसांनी इतर समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न हाणून का पाडला नाही, असा सवालही त्यांनीकेला.