लोकसत्‍ता टीम

अमरावती : माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख या जुन्‍याच चेहऱ्यांना काँग्रेसने संधी दिली आहे. प्रा. वीरेंद्र जगताप यांना सातव्‍यांदा, यशोमती ठाकूर यांना पाचव्‍यांदा, तर बबलू देशमुख यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्‍यात आली आहे. डॉ. सुनील देशमुख हे तीन वर्षांपुर्वी स्‍वगृही परतले. त्‍यांना पंधरा वर्षाच्‍या प्रतीक्षेनंतर चौथ्‍यांदा काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. चौघांचा सामना परंपरागत विरोधकांशीच होणार आहे.

यशोमती ठाकूर यांनी सर्वप्रथम २००४ मध्‍ये निवडणूक लढवली होती. त्‍यावेळी त्‍यांचा पराजय झाला होता, पण त्‍यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ अशी हॅटट्रिक करून त्‍या गेल्‍या पंधरा वर्षांपासून त्‍या आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात अडीच वर्षे त्‍या महिला व बालविकास विभागाच्‍या मंत्री म्‍हणून कार्य केले आहे. त्‍यांच्‍या विरोधात महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याची उत्‍सुकता आहे.

आणखी वाचा-तुम्ही निराश आहात? मनात आत्महत्येचा विचार येतोय… मग हे वाचाच! कारण…

धामणगावमधून प्रा. वीरेंद्र जगताप यांना तब्‍बल सातव्‍यांदा रिंगणात राहणार आहेत. १९९५ आणि १९९९ मध्‍ये यांना पराभव पत्‍करावा लागला होता. त्‍यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्‍ये ते सलग तीन वेळा निवडून आले. पण, २०१९ मध्‍ये त्‍यांचा पुन्‍हा पराभव झाला. पराभवानंतरही गेल्‍या पाच वर्षांत त्‍यांनी मतदारसंघात जनसंपर्क कायम ठेवला आहे. त्‍यांची लढत भाजपचे प्रताप अडसड यांच्‍याशी पुन्‍हा एकदा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्‍वकर्मा यावेळीही सज्‍ज आहेत.

अचलपूरमधून काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांना तिसऱ्यांदा संधी देण्‍यात आली आहे. त्‍यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने जातीय समीकरणांचा विचार केला आहे. २०१४ आणि २०१९ च्‍या निवडणुकीत बबलू देशमुख यांचा प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू यांनी पराभव केला होता. यावेळी प्रहारचे बच्‍चू कडू, भाजपचे प्रवीण तायडे आणि काँग्रेसचे बबलू देशमुख अशी तिरंगी लढत राहणार आहे.

आणखी वाचा-डॉ. सुनील देशमुखांचे काँग्रेस उमेदवारीचे वर्तुळ पूर्ण! पंधरा वर्षांनंतर मिळाली संधी

अमरावतीतून १५ वर्षांनंतर डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. गेल्‍या वेळी ते भाजपकडून रिंगणात होते. काँग्रेसच्‍या उमेदवार सुलभा खोडके यांनी त्‍यांचा पराभव केला होता. आता बदललेल्‍या राजकीय परिस्थितीत राष्‍ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्‍या सुलभा खोडके यांच्‍याशी त्‍यांचा सामना होणार आहे. जगदीश गुप्‍ता हे महायुतीत बंड करण्‍याची शक्‍यता असल्‍याने ही लढत रंजकदार होणार आहे.