वाशिम : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा सर करण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. मात्र, कुठल्याच पक्षात अद्याप जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकमत झाले नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने आधीपासूनच आपला दावा केलेला असताना आता काँग्रेस देखील येथून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मुंबईत पार पडलेल्या प्रदेश काँग्रेस च्या बैठकीत मतदार संघाचा आढावा घेतला असून काँग्रेस कडून जीवन पाटील, माणिकराव ठाकरे, चक्रधर गोटे यांच्या सह इतरही काही नेत्यांची नावे समोर येत आहेत.
एकेकाळी वाशीम, यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ काँग्रेस चा मजबूत गड होता. मात्र कालांतराने काँग्रेस च्या बालेकिल्यात शिवसेनेचा भगवा फडकत आहे. परंतू शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पाच टर्म पासून निवडून येत असलेल्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्या आहेत.
येथून काँग्रेस लढण्याच्या तयारीत असून काँग्रेस कडून देखील दावेदारी केली जात आहे. तर ठाकरे गटानेही मतदार संघातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटणार यावर सर्वस्वी अवलंबून आहे.
हेही वाचा…वर्धा : अखेर माजी आमदार अमर काळे लोकसभा लढण्यास तयार, पण…
यवतमाळ वाशीम लोकसभेचा इतिहास पाहता येथून कायमच काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आली आहे. २००९ मध्ये काँग्रेस चे हरिभाऊ राठोड विरुद्ध भावना गवळी, २०१४ मध्ये काँग्रेस चे शिवाजी राव मोघे विरुद्ध भावना गवळी तर २०१९ मध्ये काँग्रेस चे माणिकराव ठाकरे विरुद्ध भावना गवळी परंतू तीनही निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला विजय प्राप्त करता आला नाही.
राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणामुळे यवतमाळ वाशीम लोकसभेच्या जागेचा पेच महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसेना ठाकरे व काँग्रेस कडून दावेदारी होत आहे. नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी ही जागा काँग्रेसलाच मिळावी,असा आग्रह काँग्रेसकडून करण्यात आल्याची माहिती असून काँग्रेस कडून तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न राहणार असून जीवन पाटील, माणिकराव ठाकरे आणि वाशीम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्यासह इतरही नावे समोर येत आहेत. मात्र नेमकं हा मतदार संघ कुणाच्या वाटेला जाणार, यावर पुढील चित्र अवलंबून आहे.
हेही वाचा…नागपूर, रामटेक मतदारसंघांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत घोळ सुरूच
जीवन पाटील यांचे नाव आघाडीवर
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाटेला यावा, यासाठी प्रयत्न होत आहेत. काँग्रेस प्रबळ उमेदवार देण्याच्या प्रयत्नात असून जीवन पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. जीवन पाटील हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचे भाऊ स्व. उत्तमराव पाटील सहा वेळा खासदार म्हणून सुपरिचित होते. जीवन पाटील यांचे सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे.