नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी बजावल्यानंतर या पक्षाचे ‘हौसले बुलंद’ झाले असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी आंदोलने, बैठकांचा धडाका लावला असून विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील दोन जागांपैकी रामटेकची जागा काँग्रेसने परत मिळवली. तर नागपूर लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मताधिक्य कमी केले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसने भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात मताधिक्य प्राप्त केले आहे. लोकसभेतील दमदार कामगिरीमुळे पक्षाचे मनोबल उंचावले आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. त्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेशाच्या गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलने, निदर्शने आणि बैठकांचे सत्र यातून दिसून येत आहे. भाजपने नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा मुद्दा लावून धरत आंदोलन केले. महायुती सरकारच्या कारभाराविरुद्ध आक्रमक होत चिखफेक आंदोलन करून भाजला प्रतिउत्तर दिले. राज्यभर स्थानिक नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्याचा सूचना दिल्या आहे. त्यानुसार नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी रविवारी आमदार निवासात बैठक बोलावली. लोकसभेत भरभरून मतदार केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारी लागण्याची सूचना केली. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार रामटेक आणि नागपूर लोकसभेतील १२ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>पुरावा नसतानाही अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांनी…
नागपूर लोकसभेतील सहा विधानसभा जागांसाठी देवडिया काँग्रेस भवन येथे आणि रामटेक लोकसभेतील सहा विधानसभा जागांसाठी गणेशपेठ येथील काँग्रेस कार्यालयात अर्ज मंगळवारपासून उपलब्ध केले जाणार आहेत.नागपूर शहरातील विधानसभेच्या सहा जागांसाठी काँग्रेसने इच्छूक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुकांनी शहर कार्यालय, देवडीया भवन येथे अर्ज सादर करावयाचे आहे. या कार्यालयात ९ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत अर्ज उपलब्ध करण्यात येत आहेत. सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज विरित केले जातील. अर्जाची रक्कम २०० रुपये असून पक्षनिधी सर्वसाधारण वर्गातील इच्छुकांसाठी २० हजार रुपये आहे. निवडून येऊ शकणाऱ्या इच्छुकाला उमेदवारी दिली जाणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारास उमेदवारी मिळणार नाही, त्यांना अर्जासोबत जोडलेली रक्कम परत मिळणार नाही, असे काँग्रेसचे शहर प्रधान महासचिव डाॅ.गजराज हटेवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>‘भाईगिरी करोंगे तो ऐसेही मरोगे’… शेकडो बघ्यांसमोर तरुणास भोसकले; यवतमाळच्या दत्त चौकातील थरार
सुधाकर अंबोरे, राहुल तायडेंचा काँग्रेस प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यातील माजी पोलीस अधिकारी सुधाकर अंबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजन तायडे यांनी सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यावेळी उपस्थित होते. पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत करून काँग्रेस विचार घरोघरी पोहचवा, असे आवाहन केले. अंबारे आणि तायडे यांना टिळक भवन, दादर येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पक्षात प्रवेश देण्यात आला.