वर्धा: काँग्रेसची जनसंवाद यात्रा जिल्ह्यात सध्या सुरू आहे. आष्टी शहीद येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली. पहिला मुक्काम माजी आमदार अमर काळे यांनी यजमानपद स्वीकारल्याने आर्वीत झाला. पायपीट करून थकलेल्या नेते व कार्यकर्त्यांना सपाटून भूक लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेवणाची वेळ झाल्यावर समोर आले ते अस्सल ग्रामीणबाज जेवण, डाळ भाजी, भात, पोळी व हिरव्या मिरचीचा ठेचा. पटोलेंसह भुकेल्या नेत्यांनी न कुरकुरत पोटभर ताव मारला. यात्रा समन्वयक नाना गावंडे यांनी ठेच्यावर चांगलाच ताव मारीत पसंती दिली. मात्र, पुढील दोन मुक्कामातही किरकोळ बदल करीत असेच जेवण पुढ्यात आले. त्यामुळं काही मोजके नियमित कार्यकर्ते कावलेच.

हेही वाचा… अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन मुलानेच केली आईची हत्‍या; लहान भावालाही संपविले

“हा काय पक्षाचा राष्ट्रीय मेन्यू आहे का, हायकमांडने ठरवून दिला काय,” असे प्रश्न उपस्थित झाले. मात्र ते गमतीतच. कारण अशा यात्रेत साग्रसंगीत जेवणाची अपेक्षा कोणी ठेवत नाही. गावगड्यात असेच जेवण घ्यावे लागते अन्यथा यात्रेसाठी आला की जेवायला आला, असा टोला बसतो. आता आणखी देवळी, वर्धा, हिंगणघाट येथे एकूण बारा जेवणं आहेत. त्यात काय मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. देवळी येथे आमदार रणजीत कांबळे, वर्ध्यात शेखर शेंडे तर हिंगणघाट परिसरातील यात्रेत चारुलता टोकस यांच्याकडे जबाबदारी आहे.

हेही वाचा… अमरावतीतील हवा शुद्ध, देशात प्रथम क्रमांक

मेन्यूबाबत शेंडे म्हणाले की, असे काही ठरलेले नाही. सोयीचे, पचेल व परवडणारे जेवण दिले जात असते. वर्धेत काही बदल दिसतील. या यात्रेदरम्यान कृष्णाष्टमी येते. त्या दिवशी यात्रेकरूंना सुट्टी देण्यात आली आहे. किमान दहा दिवसाच्या यात्रेत या एक दिवशी तरी घरी गोडधोड खाऊ, असा दिलासा कार्यकर्ते बाळगून आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress jan sanswad yatra and food in wardha pmd 64 dvr
Show comments