वाशीम जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या पाठीशी मोठा जनाधार असून स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामीण राजकारणावर त्यांची घट्ट पकड असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील जवळपास दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांसह अकोला जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितमधील काही पदाधिकारी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याने वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा >>>‘अॅप आधारित टॅक्सी’ चालकांवर नियमबदलाचा भुर्दंड, ‘चाईल्ड लॉक’ काढल्याशिवाय परवाना नूतनीकरण नाही; ‘पॅनिक बटन’ची सक्ती
जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक गड असला तरी देशमुख यांचा या दोन्ही तालुक्यात मोठा प्रभाव आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढले होते. अमित झनक यांनी अवघ्या काही मतांनी देशमुख यांचा पराभव केला. मागील काही वर्षांपासून देशमुख काँग्रेसपासून अलिप्त होते. जनविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांची जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर चांगली पकड आहे. रिसोड पंचायत समिती, रिसोड नगरपालिका आणि जिल्ह्यातील इतरही ग्रामीण भागातील खरेदी विक्री बाजार समितीमध्ये देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यांना नेहमीच डावलण्यात आले.
जिल्हा काँग्रेस आधीच गटबाजीने पोखरली आहे. अशात देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याने काँग्रेसच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली आहे. देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हा भाजपला बळ मिळेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.