लोकसत्ता टीम
नागपूर : पवार गट, ठाकरे गट राज्यातील विविध मतदार संघातील जागांवर दावा करत असेल तर काँग्रेस पक्ष म्हणून आम्हालाही अनेक जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे. जिनके घर शीशे के होते है, वह दुसरोंके घरोपर पत्थर नही फेका करते, अशी टीका करत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण राहील याबाबत केवळ संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांशी बोलत आहे. आघाडीमध्ये कोण मुख्यमंत्री राहणार आहे हे संजय राऊत ठरवणार नाही किंवा मी सुद्धा नाही. महाविकास आघाडी एकत्र मिळून त्याबाबत निर्णय घेतील. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत आमच्या पक्षातील हायकमांड निर्णय घेतील. संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये असले तरी त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहील याबाबत माध्यमांशी बोलू नये. त्यांनी आमच्या हायकमांडशी याबाबत बोलले पाहिजे असेही नितीन राऊत म्हणाले.
आणखी वाचा-मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे आमदाराला भोवले
नागपूर शहरातील एक आणि रामटेकची जागा आम्ही लढवणार असल्याचे संजय राऊत नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे मात्र आघाडीमधील तीनही पक्ष कोण कुठली जागा लढणार हे जाहीर करण्याचा अधिकार त्यांना आहे का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
आघाडीमधील सर्वच पक्षाकडून राज्यात सर्वेक्षण केले जात आहे. शिवसेनेच्या सर्वेबाबत आम्हाला कल्पना आहे. मुंबईत ते सर्वे करत असून ते मराठवाड्यामध्ये सर्वे करत आहे. खरे तर महाविकास आघाडीने एक संयुक्त सर्वे केला पाहिजे आणि त्या सर्वेमध्ये सर्वात जास्त जागा ज्या पक्षाला दाखविल्या जाईल त्या जागा त्या त्या पक्षांनी लढविल्या पाहिजे. आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या सर्वेवरुन जागाबाबत दावा करु नये असा टोला नितीन राऊत यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला.
आणखी वाचा-बुलढाणा: मलकापुरात मुसळधारेसह वज्राघात; महिलेचा मृत्यू, एक गंभीर
महाविकास आघाडीच्या निवडणूकपूर्व सर्वेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, या सर्वेत ज्यांच्या जास्त जागा येतील हे दाखवले आहे त्यांनी त्या लढले पाहिजे असे आमचे मत आहे. आमच्या सर्वेनुसार विदर्भातील ६२ जागा आमच्या बाजूने आहेत, असा आमचा सर्वे असा सांगतो. तुम्हाला आमच्या सर्वेवर काही आक्षेप असेल तर तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे निर्णय घेत जगातील सर्वोत्कृष्ट सर्वे करणाऱ्या कंपनीकडून तो करून घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला.
© The Indian Express (P) Ltd