उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रसाद नगरात (प्लॉट नं. ४ कृष्णाई अपार्टमेंट, नागपूर ३६) महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचे नाव असलेले गोडसे हिंदू महासभेचे केंद्रीय कार्यालय सुरू करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते व माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी बुधवारी सकाळी संघटनेच्या कार्यालयाबाहेर चरख्यावर सूत कातून आंदोलन केले.नथुराम गोडसे हिंदू महासभेचे केंद्रीय कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर गुरुवारी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रसादनगरातील कार्यालयापुढे शांततेच्या मार्गाने चरख्यावर सूत कातून आंदोलन सुरू केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी की जय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रतापनगर पोलीस आंदोलनस्थळी आले. त्यांनी गुडधे व संघटनेच्या स्थानिक नेत्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यासंदर्भात गुडधे म्हणाले, आम्ही गांधी विचाराचे समर्थक आहोत. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, वादग्रस्त संघटनेच्या नेत्यांनी पोलिसांसमोरच हिंसेचे समर्थन केले आहे. गांधी आज हयात नाहीत. आता त्यांना कोणावर हल्ला करायचा आहे, पोलिसांनी याचा विचार करावा.