नागपूर : माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचा मुद्दा उपस्थित करत पी. चिदंबरम यांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केलाय. तसेच उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावनाही देशमुख यांनी व्यक्त केली. आशिष देशमुख यांनी सोमवारी (३० मे) याबाबत निवेदन जारी करत आपली भूमिका मांडली.
डॉ. देशमुख यांनी पक्षश्रेष्टींच्या उमेदवार निवडीच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रतापगडी ऐवजी महाराष्ट्रातून काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना उमेदवारी द्यायला हवी होती. कारण त्यांचा नागपूर आणि विदर्भाशी संबंध असून येथील नेत्यांशी त्यांची जवळीक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरातील ठरावाचे काय झाले असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा : “सोनिया गांधींनी स्वतः २००४ मध्ये आश्वासन दिलं, मात्र, १८ वर्षे होऊनही…”; काँग्रेस नेत्या नगमा यांचा संताप
आशिष देशमुख म्हणाले, “या शिबिरात ‘एक पद एक व्यक्ती’ आणि एका कुटुंबात एका सदस्याला उमेदवारी देण्याचा ठराव झाला होता, परंतु पी. चिदंबरम यांचा मुलगा खासदार असताना त्यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना उमेदवारी देण्यात आली, मग या ठरावाचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.