नागपूर : शहरातील संचारबंदी उठवण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते व काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे सदस्य हुसेन दलवाई मंगळवारी दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता नागपुरात पोहोचले आहेत. त्यांनी दुपारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेतली.काँग्रेसने नागपूर दंगलग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. गेल्या शनिवारी समितीतील सदस्य माणिकराव ठाकरे आणि आमदार साजिद पठाण नागपुरात आले होते. परंतु त्यांना दंगलग्रस्त जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली नव्हती. आता हुसेन दलवाई नागपूर भेटीवर आले आहेत. त्यांनी रविभवन या शासकीय निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर दुपारी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. पोलिसांची कारवाई एकतर्फी होती. झालेली घटना दुर्देवी होती. पोलिसांनी संयम बाळगायला हवा होता. , अशी प्रतिक्रिया दलवाई यांनी व्यक्त केली.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलास आंदोलनाची परवानगी द्यायला नको होती. आंदोलना दरम्यान चादर जाळणाऱ्यां विरुद्ध तातडीने करायला हवी होती. आता मुस्लीम युवकांवर कारवाई केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमरे तपासूनच आरोपींना ताब्यात घेतले पाहिजे. पोलीस १८ वर्षांखालील युवकांना अटक करत आहे. त्यांच्या भवितव्याचे काय ? , असा सवालही हुसेन दलवाई यांनी केला. तसेच पोलिसांनी नियम आणि कायद्याप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणीही केली. आयुक्तांनी हुसेन दलवाई यांना दोन कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली आहे. संचारबंदी उठवण्यात आल्याने हुसेन दलवाई यांना दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यात काहीच अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात केले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले होते. आता संचारबंदी उठवण्यात आली असून जीनजीवन पूर्वपदावर आले आहे.

कोरटकर काँग्रेस, संघाच्या नेत्यांची घरी?

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा तसेच इतिहासाचे अभ्यासक सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर हा एक महिन्यांपासून फरार होता. त्याला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकर तेलंगणामध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी होता, असा आरोप भाजपने केला. तो नेमका तो कोणाच्या घरी होता. त्याला कोणी संरक्षण दिले यांची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.