लोकसत्ता टीम

नागपूर : सध्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने जागा वाटपावार चर्चा सुरू केली आहे. दोघांसाठीही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणारी आहे. नेत्यांचे विभागवार दैौरे सुरू आहे. नागपुरात भाजपच नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच बैठक झाली. ठाकरे – पवार यांना रोखा असा संदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यापूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेतली होती. रविवारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा नागपूर दौरा होता. या दौऱ्यादरम्यान काही काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

कळमेश्वरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी रविवारी उद्धव ठाकरे नागपुरात आले. हा कार्यक्रम संध्याकाळी आहे. पण ठाकरे दुपारीच नागपुरात दाखल झाले. त्यांनी मधल्या काळात नागपूर व विदर्भातील विविध मतदारसंघातील पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आणखी वाचा-धक्कादायक… आता कमी वयातही हृदयरोग, डॉक्टर म्हणतात…

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. त्यात शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा जागांचा समावेश आहे. शिवसेने शहरात दोन व ग्रामीणमध्ये दोन अशा चार जागांची मागणी केली आहे. रामटेक लोकसभा व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा शिवसेनेने काँग्रेससाठी सोडली होती. रामटेक विधानसभेच्या जागेवरही काँग्रेसने दावा केला आहे. मात्र शिवसेना रामटेकसाठी आग्रही आहे. शहरात शिवसेनेची ताकद नाही, त्यामुळे शहरातील जागाबाबत शिवसेना जोर लावणार नाही, मात्र रामटेक आणि अन्य काही जागांबाबत मात्र जागा वाटपाच्या वेळी पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार राजेंद्र मुळक, रामटेकचे काँग्रेसचे खासदार श्याम बर्वे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आ. भास्कर जाधव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर

कळमेश्वरमधील छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्दघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे यासाठी काँग्रेस नेते सुनील केदार यांनी पुढाकार घेतला होता. ठाकरे आणि केदार यांचे स्नेहाचे संबंध आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची चर्चा झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याने काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. मात्र रामटेकच्या विजयात शिवसेनेचेही योगदान आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.