गोंदिया: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काश्मीर मधील पहलगाम येथे जाऊन जखमींची विचारपूस केली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामकडे दुर्लक्ष करीत बिहारच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले, अशी टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी नवेगावबांध येथे केली. ते शनिवारी काँग्रेस पक्षाच्या नवेगावबांध येथे मेळाव्यासाठी आले असता माध्यमांनी बोलत होते.

हा आपल्या देशावर हल्ला आहे. काँग्रेसही सरकारच्या सोबत आहे. भाजपाने आपल्या वाचाळवीरांना आवरावे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी “एक है तो सेफ आहे ” असे नारे देतात. आणि त्याचे मंत्री असे वक्तव्य करून धर्माधर्मां मध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहेत. ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या वेळी अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवलं त्यानी सहकार्य केलं असे सुरक्षित परतलेले पर्यटक सांगतात.. एवढेच नाही तर देशभरा मध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे दिले. पण ज्याप्रमाणे भाजपाचे खासदार, मंत्री वागत आहेत हे चुकीचे असल्याचे नाना पटोले म्हणाले.

राजीनामाच्या बाबतीत शहा यांनी निर्णय घ्यावा

“जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी” असे म्हणत नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना राजीनामा द्यावा अशी मागणी केली. एका बाजूला संजय राऊत हे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामा मागत आहेत, तर शरद पवार यांनी दहशतवादी विरोधी धोरण ठरवावे असे वक्तव्य केले. यावरून गृहमंत्री शहा यांच्या राजीनामाच्या विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का…? यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की ज्याप्रमाणे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सारखे असे अनेक नेते आहेत ज्यांच्या कार्यकाळा मध्ये अशा घटना घडल्या त्यावेळी त्या नेत्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. असे उदाहरण देशात असताना “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी” अशी भूमिका त्यांनी घ्यावी. पण ज्यांना सत्ताच पाहिजे गेंड्याच्या कातडीची सरकार असलेले लोक आहेत. झालेल्या घटनेची चूक लक्षात घेऊन याबाबतीत केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा. मात्र ज्याप्रकारे यावेळी देशावर हल्ला झाला आहे, त्याला उत्तर देणे फार गरजेचे आहे जेणेकरून पुढे देशावर असं कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही, असे पटोले म्हणाले.

फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावं …

घटना झालीच कशी त्याच्या खरा दोषी कोण.. यावर आत्मपरीक्षण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आहे. असे नाना पटोले म्हणाले… भाजपाने मागील १० वर्षात जो विभाजन वाद निर्माण केला त्याची फळ आम्हाला आता भोगावी लागत आहे, असे पटोले म्हणाले . शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या महायुतीची ही महाराष्ट्र सरकार शेतकरी विरोधी असून उद्योगपतीसाठी काम करणारा सरकार आहे. असा आरोप करत नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना बोनस जाहीर करूनही अद्यापही शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि या सरकार मध्ये भाजपा हा प्रमुख पक्ष आहे.ही सरकार शेतकऱ्यांना बोनस चे फायदे मिळाले नाही पाहिजे याचा विचार करते. मुठभर उद्योगपतींना न्याय कसा मिळेल याच्यावर महायुती सरकार काम करते. त्याच्या परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी बघतो आणि सरकारच्या अशा शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.