नागपूर: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता आणि त्यांच्यावर झालेले आरोप लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका निष्पक्ष वातावरणात होणे अशक्य आहे, त्यामुळे शुक्लांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : बिबट्याने अचानक धावत्या दुचाकीवर घेतली झडप अन्…
रश्मी शुक्ला १९८८ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी असून सध्या पोलीस महासंचालक पदाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडेच आहे. रश्मी शुक्ला जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या.पण महाराष्ट्र पोलीस कायद्याचे थेट उल्लंघन करून त्यांना महायुती सरकारने बेकायदेशीरपणे जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यांची निष्पक्षता आणि प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाते. रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि धमक्या देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अनेकदा खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. रश्मी शुक्ला या भाजपासाठी राजकीय प्रचारक म्हणून काम करत आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांची भूमिका पक्षपाती स्वरूपाची आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या प्रभारी पोलीस महासंचालक या नात्याने त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सदस्यांना पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात बोलावून धमकावले, असा आरोप कॉंग्रेसने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे. शुक्लांची वादग्रस्त कारकीर्द लक्षात घेता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडणे अशक्य आहे. लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करण्यासाठी यांना पदावरून मुक्त करावे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.