लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य कायम ठेवायचे असेल तर ईव्हीएम बंद झाले पाहिजे. काँग्रेसचे सरकार असताना त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोक ईव्हीएमला विरोध करीत होते. त्यावेळी ईव्हीएमबाबत एक पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले होते. त्याचे वाचन भाजपच्या नेत्यांनी पुन्हा करावे, असा सल्ला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजपला दिला.

विधाससभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर महाविकास आघाडीने आता ईव्हीएममध्ये दोष असल्याचा आरोप करत आंदोलने सुरू केले आहे. अनेक पराभत उमेदवार न्यायालयात गेले आहे. नागपुरात रविवारी काँग्रेसने ‘ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव’ आंदोलन संविधान चौकात केले भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात महादुला येथून संविधान चौकापर्यंत बाईक रॅली काढली. संविधान चौकात मिरवणूक आल्यानंतर त्या ठिकाणी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

आणखी वाचा-नाना पटोलेंवर बंटी शेळके यांचे गंभीर आरोप, म्हणाले “राहुल गांधींकडे तक्रार करणार”

जगाने नाकारलेली ईव्हीएम प्रणाली भारतात का सुरू ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग त्यासाठी आग्रही का आहे, असा सवाल उपस्थित करत सुनील केदार म्हणाले, ईव्हीएम टेम्परिंग होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही आणि त्यामध्ये टेम्परिंग केले जाऊ शकते, असा आरोप केदार यांनी केला. देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य कायम ठेवायचे असेल तर ईव्हीएम बंद झाले पाहिजे. काँग्रेसचे सरकार असताना भाजपचेच लोक ईव्हीएमला विरोध करत होते. त्यांनी पुस्तकही प्रकाशित केले होते. त्या पुस्तकाचे वाचन भाजपच्या नेत्यांनी केले पाहिजे, असा सल्लाही केदार यांनी भाजपला दिला.

आणखी वाचा-धाड दंगल : ३३ विरुद्ध गुन्हे दाखल; १७ अटकेत, दोन पोलीसासह अनेक नागरिक जखमी

ईव्हीएम विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई सुरू केली पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे आहे. सुरुवात झाली की त्याच वार सगळीकडे पोहचत असतात त्यामुळे आम्ही नागपुरात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करीत आहोत. आयोगाने आमच्या मागण्याची दखल घ्यावी. येणाऱ्या दिवसात ईव्हीएच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असेही केदार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उमरडचे नवनिर्वाचित आमदार संजय मेश्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sunil kedar urges bjp to read book on evms vmb 67 mrj