नागपूर : तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. तसेच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवेमारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तब्बल एक महिना फरार होता. आता त्यांना कोणी मदत केली यावर खल सुरू असून आरोपप्रत्यारोप सुरू आहे. त्यात आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महापुरुषांच्या अपमानानंतर कारवाई होत नसल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
भाजपचे खासदार उदयन राजे भोसले यांनी देखील महापुरुषांच्या अपमान कणाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नसल्याबद्दल सरकारला धारेवर धरले आहे. त्याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, उदयन राजे कधी कधी खरे बोलतात. त्यांना राग आल्यावर खरे बोलतात. त्यांना डोक्यात राग आल्यास ते ते कशा पद्धतीने काढतील. सांगता येत नाही. राज्यात महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची लांब लचक यादी आहे. राज्याचे तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीपासून तर अनेकांचा यादीत समावेश आहे. यापैकी किती लोकांवर कारवाई झाली, कोणावर कारवाई झाली, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकार महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना पाठिशी घालत आहे, असे चित्र आहे. त्यामळे उदयन राजे बोलले ते खरे बोलले, असेही वडेट्टीवार म्हणाले.
कर्जमाफी, लाडकी बहिणी निवडणूूक ‘जुमला’
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिण योजनेत महिलांना २१०० रुपये प्रति महिना देण्याची सरकारची नियत नाही. विधानसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी दिलेले ते आश्वासन होते. सरकारची नियमत नाही. राज्याची आर्थिक स्थिती फार वाईट आहे. राज्य आर्थिक डबघाईस गेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणी योजनांची सुरू केली. त्यामुळे राज्याची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली. त्यामुळे आता निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारची आर्थिक स्थिती नाही, नियत नाही आणि दानत नाही. केवळ मत घेण्यासाठी ‘जुमला’ होता, अशी टीका विजय वडे्टीवार यांन केली.