नागपूर : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याचा तिसरा अहवाल आणि एकूणच रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि मंगेशकर कुटुंबीयांवर टीकेची झोड उठत आहे. काँग्रेसचे विधीमंडळाचे पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर पैसे दिल्याशिवाय उपचार न करणारे रुग्णालय धर्मदाय कसे, असा प्रश्न केला. तसेच मंगेशकर कुटुंबीय पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम करत नाही, अशी टीकाही केली.
वडेट्टीवार शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहवालानुसार वेळीच त्या महिलेवर उपचार झाले असते तर तिचा जीव वाचला असता, मी मंगेशकर रुग्णालय आणि मंगेशकर कुटुंबीयांबद्दल केलेल्या वक्तव्याववरून टीका केली जात आहे. परंतु, मी त्याची पर्वा करत नाही. सत्य जगासमोर कधीतरी आलेच पाहिजे.
थोर समाजसेवक प्रकाश आमटे कर्करोगाच्या उपचाराकरिता दीनानाथ रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्याकडून एक रुपयाही घेणार नाही, असे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. पण, उपचार सुरू झाल्यानंतर बाहेरून औषधी मागवण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये उकळण्यात आले. महाराष्ट्र भूषण, थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोडले नाही तर साधारण कुटुंबाची काय, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
वडेट्टीवार यांनी दिवंगत लता मंगेशकर यांच्याबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले, विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी नागपुरात मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा तिथून निरोप आला की, पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा. विशेष विमानाची व्यवस्था करा. त्यासाठी २२ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. या रकमेचा धनादेश देण्याची तयारी विदर्भ साहित्य संघाने दर्शवली. परंतु, मंगेशकर यांनी धनादेश घेण्यास नकार दिला आणि रोख रकमेचा आग्रह धरला. आम्ही संस्था असल्याने रोख रक्कम देणे शक्य नाही, असे विदर्भ साहित्य संघाने सांगितले. त्यानंतर लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हृदयनाथ जसे सांगत आहेत तसेच करा, असे सांगितले. अखेर तो कार्यक्रमच रद्द करावा लागला.
एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिले होते. तेव्हा त्यांनी संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले. त्या खासदाराने ते पैसे दिले. कार्यक्रमाची तारीख जवळ आली, परंतु ऐन वेळेवर आणखी तीन लाख रुपये मागितले गेले. तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायनाचा कार्यक्रम ठरला होता, ते निमंत्रण आशा भोसले यांच्यासाठी होते. लता मंगेशकर यांना निमंत्रण नव्हते. मात्र लता मंगेशकर यांनी तिथे गायन केले. त्याचेही मानधन घेण्यात आले, असेही वडेट्टीवार म्हणाले.